फोंडाघाट महाविद्यालयात संविधानावर पोस्टर स्पर्धा संपन्न !
फोंडाघाट / कुमार नाडकर्णी – येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष (IQAC) यांच्या वतीने संविधान अमृत महोत्सव अंतर्गत ‘संविधान’ या विषयावर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी संविधान वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना, प्रत्येक नागरिकाने आपले हक्क व कर्तव्ये जाणून घेतली पाहिजेत, असे सांगितले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘माझे संविधान – माझा अभिमान’, न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता, संविधान निर्मिती, महिलांचे हक्क अशा विविध विषयांवर प्रभावी पोस्टर्स सादर केली.
या पोस्टर स्पर्धेत सायली पेडणेकर हिने प्रथम क्रमांक, प्रियांका मोंडकर हिने द्वितीय क्रमांक, तर संजना सांडिम हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की, संविधानाच्या आधारेच देशाचा सामाजिक व आर्थिक विकास होत असतो. संविधानाचे जनजागरण सर्व स्तरांतून होणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
*”संविधानाचे महत्त्व” या विषयावर भित्तीपत्रिकेचे प्रकाशन !*
महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने संविधान अमृत महोत्सव – हर घर संविधान या उपक्रमांतर्गत “संविधानाचे महत्त्व” या विषयावर तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष रायबोले यांनी प्रास्ताविक केले.आपल्या मनोगतात त्यांनी संविधानाचे सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी संविधानाची मूल्ये आत्मसात करून ती समाजापर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन केले.
भित्तीपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांनी संविधानाचे राष्ट्रीय एकात्मतेतील महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, संविधानामुळे देशाची झालेली प्रगती, युवा वर्ग आणि संविधान, संविधानाचे सर्वोच्च स्थान, संविधान सभेचे योगदान, तसेच “जगातील सर्वात महान संविधान” आणि “लोकशाहीचा जनक म्हणून संविधान” अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक लेख सादर केले होते. यावेळी प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत संविधानाच्या मूल्यांची जपणूक करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे नमूद केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













