खेड प्रतिनिधी – खेड तालुकरतील सुकिवली जिल्हा परिषद गटात शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार व शिवसेना तालुकाप्रमुख सचिन विश्राम धाडवे यांनी सोमवारी मोठ्या उत्साहात आणि प्रचंड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळपासूनच गावात ढोल-ताशांच्या निनादात कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली होती. अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीला भव्य स्वरूप लाभले होते. विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी ढोल, ताशा, लेझीम, भगवे पताकांचे फड आणि मोटार ताफ्याचा मोठा लवाजमा यामुळे परिसरात निवडणुकीची हवा चांगलीच निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.
अर्ज दाखल करण्यास जाताना बोलताना सचिन धाडवे यांनी शिवसेना नेते रामदास कदम व राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “आजची ही मिरवणूक म्हणजे आगामी विजयावर शिक्कामोर्तब आहे. सुकिवली गटातील जनतेचा अपार पाठिंबा आणि शिवसैनिकांची ताकद पाहता आमचा विजय निश्चित आहे.” त्यांच्या या आत्मविश्वासपूर्ण वक्तव्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
मिरवणुकीदरम्यान हजारो कार्यकर्ते भगवे झेंडे फडकवत घोषणाबाजी करत होते. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘सचिन धाडवे आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’, अशा घोषणा सतत गुंजत होत्या. यामुळे परिसरात विजयाचीच हवा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. महिलांचे मोठ्या संख्येने सहभाग, युवकांचा जोश आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची शांत पण दृढ उपस्थिती यामुळे हे शक्तिप्रदर्शन अधिक प्रभावी ठरले.
या भव्य अर्ज दाखल मिरवणुकीमुळे सुकिवली व परिसरात सचिन धाडवे यांच्या विजयावर शिक्का मोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.













