सोमवार पर्यंत ११० अर्जांचे झाले आहे वितरण
अर्ज दाखल करण्यासाठी आता उरले फक्त दोन दिवस
राजापूर प्रतिनिधी :राजापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी एकही अर्ज दाखल झालेला नाही. मात्र सोमवारी एकूण ५४ अर्ज वितरित करण्यात आले असून गेल्या चार दिवसांत एकूण ११० अर्ज वितरित झाले आहेत. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या दोनच दिवसांचा कालावधी उरला असून या दोन दिवसातच अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे.
राजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी तर पंचायत समितीच्या बारा गणांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन चार दिवस झाले असून या चार दिवसात एकही अर्ज दाखल झालेला नाही. मात्र या कालावधीमध्ये पहिल्या दिवशी तेरा तर दुसऱ्या दिवशी ४३ उमेदवारी अर्ज यांचे वितरण करण्यात आले आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी कामकाज बंद होते. सोमवारी दिवसभरात ५४ अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत एकूण ११० अर्जाचे वितरण झाले आहेत. त्यामुळे आता अखेरच्या दोन दिवसांत सर्वच राजकिय पक्षांतील उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जाणार आहेत.













