नॅशनल इंग्लिश स्कुल अॅन्ड ए.ई. कालसेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात पार

राजापूर (वार्ताहर): येथील बज्मे उर्दू अदब संचलित नॅशनल इंग्लिश स्कुल अॅन्ड ए.ई. कालसेकर कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष असिफअली चौगुले यांच्या अध्यक्षते खाली पार पडला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. हुस्नबानू खलिफे उपस्थित होत्या. या वेळी सौ. हुस्नबानू खलिफे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील शिक्षण संपादन केले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिस्तीचे महत्व त्यांनी पटवून दिले व शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे उपाध्यक्ष कमालुददीन मापारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सौ. हुस्नबानू खलिफे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. हुस्नबानू खलिफे यांचा संस्था व शाळेच्या वतीने शाळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नगर सेवक सौरभ खडपे, सुबोध पवार, शबाना मुल्ला, सादिया गिरकर तसेच या विद्यालयाचे माजी शिक्षक दानिश पाटणकर यानी सी. ए. पदवी प्राप्त केल्या बदद्ल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशालेच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, हिंदी काव्यावाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाक कला स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, क्रिडा स्पर्धा तसेच इंडियन टॅलेन्ट परीक्षा, ब्रेन डेव्हपमेन्ट परीक्षा, रंगोत्सव, मंथन परीक्षा, विज्ञान प्रदर्शन आणि शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
प्राचार्य शकील अहमद मोकाशी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. यानंतर शाळेतील विदयार्थ्यांनी नाट्यछटा, गीते, नृत्य एकपात्री अभिनयातून आपल्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवित उपस्थितांची मने जिंकली.
प्रारंभी संस्थेचे सदस्य शकील काजी यांचे निधन झाल्याने व संस्थेचे सदस्य अ. सलाम खतिब यांचा पुतण्या व शाळेचा माजी विद्यार्थी आमान गणी खतिब याचे निधन झाल्याने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष कमालुददीन मापारी, सचिव नुरुददीन काजी, खजिनदार शरफुददीन शेमना, सदस्य कलीम अहमद चौगुले, मन्सूर काजी, आशफाक मापारी, शमसुददीन काजी, माजी नगराध्यक्षा सौ. मुमताझ काजी, नगर सेवक सौरभ खडपे, शबाना मुल्ला, पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नयन ओगले, कल्पेश बागायतदार, वसीम सय्यद, सैरीना सोलकर, नम्रता तांबे, समरीन वाडकर यांनी केले तर शाळेच्या उपमुख्याध्यापिका प्रेरणा बाकाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.