प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापूर :जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी खुले झाल्याने नेत्यांनी आपल्या पत्नीसह, लेकी, सुना यांना मैदानात उतरवण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे त्या त्या मतदारसंघातून आपल्यालाही संधी मिळेल या आशेवर पक्षाचे काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांचा चुराडाहोणार आहे.अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो. शिवाय ते मानाचे पद असल्याने ज्यांना विधानसभेला संधी मिळत नाही, असे नेते या पदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावू लागले आहेत.
१.कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली मतदारसंघातून सुयशा अंबरीश घाटगे या मैदानात उतरणार आहेत. त्या भाजपच्या उमेदवार असतील. मंत्री हसन मुश्रीफ यांचीही ताकद त्यांच्यामागे असेल. त्या यापूर्वीही जिल्हा परिषदेला निवडून आल्या होत्या. अंबरीश घाटगे हे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे चिरंजीव आहेत.ते जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते
२.भाजपचे इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका कोरोची मतदारसंघातून लढणार आहेत. त्या आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या होणाऱ्या सून आहेत.
३.शाहूवाडी तालुक्यातील पिशवी-बांबवडे मतदारसंघातून राजकुंवर रणवीर गायकवाड या निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा माहेरचा नागरिकांचा मागास प्रवर्गाचा दाखला आहे. त्याआधारे ओबीसी पुरुष गटातून निवडणूक लढवून त्या अध्यक्षपदाच्या दावेदार होऊ इच्छितात. त्यांचे पती रणवीर हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. लढवून त्या अध्यक्षपदाच्या दावेदार होऊ इच्छितात. त्यांचे पती रणवीर हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत.
४.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी आपण ही निवडणूक लढणार नसल्याचे परवाच जाहीर केले होते. परंतु कुंभोज मतदारसंघातील इच्छुकांनी त्यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह धरल्याने त्या पुन्हा भाजपकडून मैदानात येऊ शकतात. त्या गोकूळच्या संचालिका आहेत.
६.राधानगरी तालुक्यात खरी धुमश्चक्री आहे. तिथे कसबा तारळे मतदारसंघातून गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची कन्या अमृता डोंगळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून तयारीत आहेत. याच पक्षाकडून माजी आमदार के. पी. पाटील यांची कन्या व भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांची पत्नी रुपाली पाटील यांनीही तयारी केली आहे. भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे यांच्या पत्नी भाग्यश्री या काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. याच मतदारसंघातून भाजप पक्षातून ऋतुजा रविश पाटील (कौलवकर)यांनीही दावा केला आहे. या लढतीमागेही अध्यक्षपदाची आशाच आहे
६.गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत.७.चंदगड तालुक्यातील कुदनूर मतदारसंघातून भाजपकडून माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या सून ज्योती दीपक पाटील या लढणार आहेत. ही त्यांची तिसरी टर्म आहे. त्यांनी जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण सभापती म्हणूनही काम केले आहे.
८.करवीर तालुक्यातील शिंगणापूर संघातून काँग्रेसकडून रसिका अमर पाटील या पुन्हा मैदानात उतरत आहेत. गेल्या निवडणुकीत त्या अपक्ष निवडून आल्यावर त्या शिक्षण सभापती झाल्या होत्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या त्या सून आहेत.
९.कागल तालुक्यातील बोरवडे मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांच्या आई शोभा गणपतराव फराकटे या लढणार आहेत. त्या यापूर्वी पंचायत समिती सदस्या होत्या. तिथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटातून शीतल फराकटे या निवडणुकीत उतरल्या आहेत.












