आबलोली (वार्ताहर)
गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी आपल्या मनोगतातून नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा’ या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ब्रीद वाक्याची आठवण करून देऊन आजच्या तरुण पिढीने देशावर प्रेम करून देशाप्रती काहीतरी केले पाहिजेत. तेंव्हाच नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांना खरे अभिवादन केले असे होईल. असे सांगून सर्व उपस्थित प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. दिनेश पारखे, प्रा. चैत्राली झिंबर, प्रा. सुभाष घडशी, ग्रंथपाल श्री धनंजय गुरव व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











