मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे मागवणे येथे ग्रामपंचायत आणि परिसरातील शाळा व अंगणवाडी यांनी एकत्रित रित्या प्रजासत्ताक दिन साजरा केला.ध्वजारोहण मालवण पंचायत समिती विस्तार अधिकारी तथा मर्डे ग्रामपंचायत प्रशासक सुनिल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विध्यार्थी व ग्रामस्थ यांना उद्देशून सुनिल चव्हाण म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. आपल्या देशाची लोकशाही मूल्ये आणि संविधानाने दिलेले हक्क यांचा जागर करणारा हा दिवस आहे.आपल्या देशाची एकता व अखंडता कायम राखण्याचा संदेश दिलाय आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला केवळ अधिकारांची जाणीव करून देत नाही, तर आपल्या कर्तव्यांचीही आठवण करून देतो असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी शंकर कोळसुलकर, मंडळ अधिकारी, तलाठी, बागवे हायस्कुल, केंद्रशाळा मसुरे, भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल, तसेच अंगणवाडी, आरोग्य व कृषी विभागाचे कर्मचारी, शाळांचे विध्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणा नंतर देशभक्तीपर समुहगान, समूहनृत्य सादरीकरण झाले. ग्रामस्थ विध्यार्थी यांना साक्षरता आणि कुष्ठरोग मुक्तीची शपथ देण्यात आली.












