आसोली पंचायत समिती मध्ये भाजपचे संकेत धुरी बिनविरोध विजयी
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात धक्कादायक चित्र निर्माण झाले. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली त्यामुळे वेंगुर्ला भाजपा मध्ये नाराजी दिसली. तर वेंगुर्ला पंचायत समिती आसोली मतदारसंघात भाजपचे संकेत धुरी यांची बिनविरोध निवड झाली.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद गटातून १३ तर वेंगुर्ला पंचायत समिती गणातून २३ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.आता जिल्हा परिषद ५ जागांसाठी १६ तर वेंगुर्ला पंचायत समितीच्या उर्वरित ९ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.
आज वेंगुर्ला निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी व सहायक अधिकारी हेमंत किरुळकर व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सार्वत्रिक निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया वेंगुर्ला तहसील निवडणूक कार्यालयात पार पडली.












