खेड (प्रतिनिधी) – राजकारणात मतदारसंघ बदलतात, प्रशासकीय सीमारेषा बदलतात, समीकरणे बदलतात; मात्र माणसांमाणसांतील नातं आणि विश्वास कधीच बदलत नाही, याचा प्रत्यय पंधरागाव धामणंद पट्ट्यात पुन्हा एकदा आला. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी या भागाला भेट दिली आणि हा दौरा केवळ प्रचारासाठी नसून आपल्या राजकीय आयुष्याशी जोडलेल्या माणसांना भेटण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२००८ मध्ये खेड विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यावेळी खेड तालुक्यातील साडेतीन जिल्हा परिषद गट खेड विधानसभा मतदारसंघात, तर उर्वरित साडेतीन गट दापोली विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाले. त्याआधी अत्यंत दुर्गम व दुर्लक्षित असलेल्या पंधरागाव धामणंद पट्ट्याला विकासाची दिशा देण्याचे काम रामदास भाई कदम यांनी मनापासून केले होते. आज हा विभाग गुहागर विधानसभा मतदारसंघात असला, तरी या परिसराशी असलेले त्यांचे भावनिक नाते कायम असल्याचे या भेटीतून दिसून आले.
सभेदरम्यान बोलताना रामदास भाई भावूक झाले. “माझ्या राजकीय प्रवासात सर्वाधिक प्रेम, विश्वास आणि ताकद मला याच धामणंदच्या लोकांकडून मिळाली. हा विभाग माझ्या राजकीय आयुष्याचा श्वास आहे,” असे उद्गार त्यांनी काढले. त्यांच्या या शब्दांनी संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले.
सभा संपल्यानंतर तसेच सभेपूर्वी, १९९० च्या दशकापासून रामदास भाईंसोबत सावलीसारखे उभे राहिलेले वयोवृद्ध कार्यकर्ते आणि जुने सहकारी त्यांच्या भेटीसाठी पुढे आले. कोणी हात धरून उभा राहिला, तर कोणी घट्ट मिठी मारून डोळे पुसले. पंधरा वर्षांचा काळ लोटूनही रामदास भाई प्रत्येकाला नावाने हाक मारत होते. “एवढा मोठा नेता असूनही आजही आमची आठवण ठेवतो,” या भावनेने अनेकांचे डोळे पाणावले.
या भेटीत गावागावात केलेल्या विकासकामांची, रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी लढलेल्या संघर्षाची उजळणी झाली. सध्या या मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव असले, तरी रामदास भाईंनी या भागात केलेल्या विकासकामांची जाणीव आजही लोकांच्या मनात ताजी आहे. ग्रामस्थांनी थेट शब्दांत सांगितले की, “तुम्ही केलेला विकास आम्ही कधीही विसरलेलो नाही.”
या भावनिक वातावरणात धामणंद विभागातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी रामदास भाईंच्या माध्यमातून शिवसेनेकडून उभ्या असलेल्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा ठाम शब्द दिला. त्या दिवशी संपूर्ण धामणंद पट्ट्यात एकच भावना ठळक होती—नेता मोठा असतो, पण तो माणूस म्हणून आपलासा वाटला, तरच नातं टिकतं.










