ओंकार गोवर्धन, अनिता दाते यांच्यासह दिग्गज कलाकारांची मांदियाळी
रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीतील नाट्यप्रेमींसाठी ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी ‘नाट्यजल्लोष’ साजरा होणार आहे. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये रात्री ९.३० वाजता दोन दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होणार असून, यानिमित्ताने मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील लोकप्रिय तरुण कलाकारांची मांदियाळी रत्नागिरीत येत आहे. ७ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ललित कला केंद्र निर्मित ‘इथेच टाका तंबू’ आणि ८ फेब्रुवारी रोजी सोशल नेटवर्किंग फोरम आणि सपान, नाशिक निर्मित ‘तो राजहंस एक’ ही दोन नाटके सादर होणार आहेत.
शनिवारी (दि. ७) सादर होणाऱ्या ‘इथेच टाका तंबू’ या नाटकात ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता ओंकार गोवर्धन प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील अभिनेत्री अश्विनी कासार, ‘तुला पाहते रे’ मधील ज्येष्ठ अभिनेते उमेष जगताप आणि ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अमेय बर्वे अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही सर्व मंडळी दैनंदिन मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली असली तरी रंगभूमीशी त्यांची नाळ आजही घट्ट जोडलेली आहे.
दुसऱ्या दिवशी, रविवारी (दि. ८) ‘तो राजहंस एक’ या नाटकाच्या निमित्ताने ‘देवबाभळी’ फेम लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांना अभिनेता म्हणून रंगमंचावर पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या जोडीला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील लोकप्रिय ‘राधिका’ म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दत्ता पाटील आणि सचिन शिंदे यांसारख्या प्रयोगशील लेखकांनी ही नाटके शब्दबद्ध केली असून, संवेदनशील विषयांची मांडणी हे या नाटकांचे वैशिष्ट्य आहे.
हे दोन्ही प्रयोग प्रेक्षकांसाठी एक अप्रतिम नाट्यानुभव ठरणार आहेत. संस्थेच्या सभासदांना ही नाटके विनामूल्य पाहता येणार असून, अन्य प्रेक्षकांसाठी अतिशय अल्प दरात देणगी मूल्य प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रयोगांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर बैठक व्यवस्था केली जाणार असून, रत्नागिरीतील रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













