मुलतानी बेकरीचे माजी मालक सुनील सदारंगणी यांची उडी मारून आत्महत्या

सोलापूरच्या सुप्रसिद्ध मुलतानी बेकरीचे माजी मालक सुनील मोतीलाल सदारंगणी (५९) यांनी गुरुवारी दुपारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शहरातील विजापूर रोड परिसरातील एका अपार्टमेंट इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून त्यांनी उडी घेतली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. कोणतीही सुसाइड नोट आढळलेली नाही. कुटुंबीयांच्या माहितीनुसार ते आर्थिक अडचणी व मानसिक तणावातून जात होते.


विजापूर रोड परिसरात घडली घटना

कोल्हापूर : सोलापूरच्या विजापूर रोड परिसरातील एका अपार्टमेंट इमारतीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली. सुनील मोतीलाल सदारंगणी हे काही वर्षांपूर्वी मुलतानी बेकरी विकून पुण्यात स्थायिक झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे 2.30 वाजता त्यांनी आपली कार पार्क करून इमारतीत प्रवेश केला आणि बायोमेट्रिक चेक-इन टाळण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला.

सुरुवातीला ते टेरेसच्या बाजूने चालताना दिसले. एका सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर रक्षकाने त्यांना १०व्या मजल्यावर खाली नेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदारंगणी यांनी रक्षकाला परत जाण्यास सांगितले आणि गाडीच्या चाव्या मागे ठेवल्याचे सांगून पुन्हा वर गेले. रक्षक पुन्हा टेरेसवर पोहोचेपर्यंत सदारंगणी यांनी उडी घेतली, असे पोलिसांनी सांगितले.

आर्थिक अडचणी व मानसिक तणाव

पोलिसांनी कारच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे सदारंगणी यांची ओळख पटवली. सोलापूरचे पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी सदारंगणी हे मानसिक तणावात व कर्जबाजारी असल्याची माहिती दिली आहे. कोणताही गैरप्रकार आढळलेला नाही आणि सुसाइड नोट सापडलेली नाही. कुटुंबीय दु:खात असल्याने त्यांचे सविस्तर जबाब अद्याप नोंदवलेले नाहीत.

एका जवळच्या नातेवाईकाने प्रहार डिजिटल शी बोलताना सांगितले की, सदारंगणी हे सिंधी समाजाचे होते. त्यांचे वडील मोतीलाल सदारंगणी यांनी मुलतानी बेकरीची स्थापना केली होती, जी पुढे खूप प्रसिद्ध झाली. कुटुंब पिठाची गिरणीही चालवत होते. वडिलांच्या निधनानंतर सुनील सदारंगणी यांनी व्यवसाय सांभाळला, मात्र कर्जाच्या ओझ्यामुळे तो विकावा लागला.

सदारंगणी यांच्या पश्चात दोन मुलगे आहेत. त्यापैकी एक मुलगा परदेशात स्थायिक झाला असून दुसरा मुलगा चार वर्षांपूर्वी पुण्यात स्थायिक झाला होता. शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाची शहरात तिसरी पिढी असल्याने अंत्यसंस्कारावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.