खेड (प्रतिनिधी) : मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा (ईव्हीएम) बंद पडत असल्याच्या घटनांवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून टाटा–बिर्ला असोत वा फुटपाथवरील भिकारी, प्रत्येक नागरिकाला समान मतदानाचा अधिकार दिला असून हा अधिकार अमूल्य आहे, असे कदम यांनी सांगितले. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदार मतदानासाठी बाहेर पडत असताना अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
कदम यांनी सांगितले की, उमेदवार असलेले त्यांचे बंधू अण्णा कदम यांनाही ईव्हीएम बिघाडामुळे जवळपास ३० मिनिटे मतदान केंद्राबाहेर थांबावे लागले. काही ठिकाणी सकाळपासूनच मतदान सुरू होऊ शकलेले नाही, कारण तेथील मशीन बंद असल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार असल्याचे कदम यांनी जाहीर केले. सरकार आणि सत्ता आपल्या बाजूची असली तरी योग्य नियोजन आणि व्यवस्था आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात शासनाने आणि निवडणूक आयोगाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली. जर ईव्हीएम यंत्रणा सुरळीतपणे राबवता येत नसेल आणि मतदारांना दोन-तीन तास ताटकळत थांबावे लागत असेल, तर पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यामुळे निवडणुकीतील मशीन मॅनेजमेंटबाबत जनतेच्या मनात निर्माण होणारा संशय दूर होईल, असेही कदम यांनी सांगितले. अन्यथा किमान ईव्हीएम मशीन बंद पडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.













