ईव्हीएम बिघाडामुळे संभ्रम नको, मतदारांनी पॅनिक होऊ नये – प्रांताधिकारी वैशाली पाटील

खेड (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मतदान कार्यक्रम आज, शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी पार पडत असून खेड तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन वारंवार बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. काही मतदान केंद्रांवर तब्बल तीन ते चार वेळा मतदान यंत्रे बदलावी लागल्याने मतदारांमध्ये तसेच उमेदवारांमध्ये काही प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर खेडच्या प्रांताधिकारी वैशाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याच्या घटनांना दुजोरा दिला. मात्र, ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय सुरळीतपणे सुरू असून ज्या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे त्या ठिकाणी तात्काळ पर्यायी ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मतदारांनी किंवा उमेदवारांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये तसेच अशा घटनांमुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे. निवडणूक प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून प्रत्येक मतदाराचा मतदानाचा हक्क अबाधित राहील, याची पूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ‘प्रहार Digital’ शी बोलताना त्यांनी असेही स्पष्ट केले की, खेड तालुक्यातील मतदान प्रक्रिया सायंकाळी ५.३० वाजता अधिकृतपणे संपणार असली तरी त्या वेळेपर्यंत मतदान केंद्रांवर रांगेत उभ्या असलेल्या सर्व मतदारांचे मतदान पूर्ण झाल्यानंतरच मतदान प्रक्रिया थांबवली जाईल. त्यामुळे प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.