बारामतीहून पुण्यात उपचारासाठी हलवले
डॉ. परवेझ ग्रांट यांनी दिली अधिकृत माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस (सप) अध्यक्ष शरद पवार यांना घशाचा संसर्ग आणि सततच्या खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृतीत बिघाड जाणवल्यानंतर खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे निरीक्षण असून आवश्यक तपासण्या सुरू आहेत. पवार यांच्या प्रकृतीबाबत काळजीचे कारण नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (सप) अध्यक्ष शरद पवार यांना सोमवारी दुपारी घशाचा संसर्ग आणि सततच्या खोकल्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत बदल जाणवल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जवळच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 85 वर्षीय ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बारामती येथील निवासस्थानातून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
या संदर्भात रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ तसेच व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रांट यांनी शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, पवार यांच्या आरोग्याची माहिती जाणून घेण्यासाठी राजकीय नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून विचारपूस केली जात आहे. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.








