ड्रेनेज दुरुस्तीच्या नावाखाली 6.7 कोटींची फसवणूक; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

सेवानिवृत्त अधिकाऱ्याला कामगारांनी वेगवेगळ्या शुल्कांच्या नावाखाली लुटले
पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपासात सक्रिय

पुण्यात ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तब्बल 6.7 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एप्रिल 2024 ते जानेवारीदरम्यान ही फसवणूक करण्यात आली. कामगारांनी विविध सरकारी शुल्क, साहित्य आणि यंत्रसामग्रीच्या नावाखाली मोठी रक्कम उकळली. प्रत्यक्षात मात्र कोणतेही काम करण्यात आले नाही. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.


पुणे : विश्रामबाग पोलिसांनी ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे खोटे आश्वासन देऊन एका खासगी कंपनीच्या सेवानिवृत्त अतिरिक्त संचालकाची तब्बल 6.7 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा पुरुषांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी प्रामुख्याने कॅज्युअल कामगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मंगळवारी या प्रकरणाचा पुढील तपास हाती घेतला. EOW अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संबंधित बंगल्याजवळील ड्रेनेज लाईन जुनी असून त्यात भेगा पडल्या होत्या तसेच त्यावर झाडे उगवली होती.

सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा बंगला काही अंशी भाड्याने दिलेला असून या समस्येमुळे भाडेकरूने तक्रार केली होती. त्यानंतर पीडित व्यक्तीने ड्रेनेज दुरुस्तीसाठी विविध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आणि कामगारांशी संपर्क साधला.

त्याचदरम्यान एका कामगाराने पीडिताशी संपर्क साधून 65 हजार रुपये श्रम शुल्क आणि वेगळे यंत्रसामग्री शुल्क लागेल, असे सांगितले. पीडिताने यास संमती दिल्यानंतर आरोपीने जागेची पाहणी केली आणि पाईपलाईन हलवणे, वीज तारा काढणे, पुणे महानगरपालिकेचे शुल्क, पाणी विभागाचे शुल्क अशा अनेक बाबींचा खर्च सांगितला.

या सर्व खर्चासाठी साहित्य शुल्कासह 15.53 लाख रुपये मागण्यात आले. त्यानंतर आरोपी आणि त्याचे साथीदार वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या नावाखाली सातत्याने पैशांची मागणी करत राहिले. पीडिताने विश्वास ठेवून वेळोवेळी मोठ्या रकमा हस्तांतरित केल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, एकूण 6.7 कोटी रुपये आरोपींना देण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने पीडिताने चौकशी केली असता आरोपी पीएमसी अधिकाऱ्यांचे काम बाकी आहे अशी कारणे देत होते.

यानंतर आरोपींनी नातेवाईकांच्या मृत्यूची खोटी कारणे सांगून काम टाळले. पीडिताने या मृत्यूंबाबत चौकशी केली असता सर्व दावे खोटे असल्याचे उघड झाले. अखेर पीडिताने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.