

पुराचे पाणी बाजारपेठेत शिरण्याच्या शक्यतेने व्यापारी, नागरिक सतर्क
राजापूर नगर परिषदेचा सावधानतेचा ईशारा
भातशेती पाण्याखाली
राजापूर तालुक्यात सरासरी 123.62 मिमी पावसाची नोंद
संतोष मोंडे | राजापूर : राजापूर शहर आणि तालुका परिसरात बुधवारी सायंकाळनंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने अर्जुना आणि कोदवली नदयांनी धोक्याची पातळी गाठली आहे. पुराच्या पाण्याने जवाहरचौकातील ध्वजस्तंभाला वेढा देत बाजारपेठेकडे आगकुच केल्याने शहरात पूरस्थिती कायम राहिली आहे. तर पुराचा वाढता धोका लक्षात घेता राजापूर नगर परिषदेने सायरन वाजवून सावधानतेचा ईशारा दिला आहे. राजापूर तालुक्यात सरासरी 123.62 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी अर्जुना नदीला पुर आल्याने नदीकाठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. तालुक्यात सर्वत्र नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मंगळवार दुपारपासुन तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. अर्जुना नदीने धोक्याची पातळी गाठल्याने राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी भरु शिरू लागले आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने सायरन वाजवुन नागरिकाना सावधानतेचा इशारा दिला आहे . या हंगामात पावसाळ्यात पहिल्यांदाच पुराचे पाणी जवाहर चौकाच्या पुढे आले असल्याने व्यापारी व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असुन अद्यापही पाउस मुसळधारपणे कोसळत असल्याने पाणी वाढण्याची शक्यता आहे . अर्जुना नदीने काल इशारा पातळी ओलांडल्याने शहरातुन वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहु लागल्या होत्या . बुधवारी पावसाचा जोर वाढल्याने पुराचे पाणी जवाहर चौकातील ध्वजस्तंभापर्यंत आले होते. मात्र पावसाचा जोर अद्यापही कमी न झाल्याने गुरुवारी पुराची तिव्रता वाढली असुन पुराचे पाणी बाजारपेठेच्या मुखाशी आले आहे. बाजारपेठेत फॅमिली बाजारपर्यंत पुराच्या पाण्याने धडक मारली आहे.
बुधवारपासुन पुराचे पाणी वाढु लागल्याने व जवाहर चौकात पाणी आल्याने एस टी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. गुरूवारीही शहरातील एस. टी. वाहतुक बंद ठेवण्यात आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजारही एस टी डेपो समोर महामार्गावर हलवण्यात आला आहे. प्रशासनाने कालच गुरुवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे विद्यार्थ्यांचा हेलपाटा वाचला आहे.पुराची तिव्रता वाढल्याने शहरातील गुजराळी, चिंचबांध वरचीपेठ, आंबेवाडी भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी येवून वाहतुक बंद झाली आहे. तर जवाहर चौकातून धोपेश्वरकडे जाणाऱ्या भागातही पाणी असल्याने मार्ग बंद झाला आहे. पुराचे पाणी अजुन वाढण्याची शक्यता असल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. तर सलग दोन ते तीन दिवस संततधार पाऊस पडत असल्याने अर्जुना नदी काठावरील गावांतील भातशेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर तालुक्यातील डोंगर येथील नदीला पूर आल्याने पुराचे पाणी बाजारपेठेत व वस्तीत शिरले आहे.
राजापूर तालुक्यात गुरूवारी राजापूर मंडळ 130 मिमी पावसाची नोंद झाली. तरओणी मंडळ 107 मिमी, कुंभवडे मंडळ 109 मिमी, नाटे मंडळ 165 मिमी, जैतापूर मंडळ 161मिमी, कोंडये तर्फे सौंदळ 89मिमी, पाचल मंडळ 126 मिमी, सौंदळ मंडळ 102 मिमी असा एकूण पाऊस 989 मिमी झाला असून सरासरी 123.62 मिमी पावसाची नोंद झाली. गुरूवार अखेर एकूण पाऊस 14687+ 989= 15676 मिमी तर सरासरी 1959.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.











