शिशु विहारच्या माजी शिक्षिका श्रीमती मंदा भावे यांचे निधन

राजापूर (वार्ताहर): शहरातील समर्थनगर भटाळी येथील रहिवासी व शिशु विहारच्या माजी शिक्षिका श्रीमती मंदा भावे यांचे शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी डेरवण येथील भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. राजापूर हायस्कूल येथील दिवंगत शिक्षक ए. जी. भावे यांच्या त्या पत्नी होत.
त्यांना कर्करोग हा दुर्धर आजार जडला होता. त्यांच्यावर डेरवण येथील भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू होते. कर्करोगाशी झुंज देत असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शनिवारी सकाळी शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
भगिनी मंडळ राजापूर संस्थेत ते सक्रीय कार्यरत होत्या. पुर्वी शिशू विहार, राजापूर मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. तसेच समर्थ नगर भटाळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असे.
त्यांच्या पश्चात अभिनेता विनायक भावे व अभय भावे हे दोन विवाहित मुलगे सुना व नात असा परिवार आहे.