पापाचे नाश करणारा धूतपापेश्वर!

महाशिवरात्री उत्सव विशेष
——————————————————-

संतोष मोंडे, राजापूर
पौष सरला कि आम्हा राजापूरवासियांना वेध लागतात ते धोपेश्वर यात्रेचे. माघ सरता सरता होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेची कमालीची हुरूहुर मनाला लागते. महाशिवरात्रीला केवळ दर्शनाने पापांचे क्षालन आणि दु:खाचे हरण होणाऱ्या श्री देव धुतपापेश्वराचे दर्शनासाठी भाविक आतुर झालेला असतो. निसर्गाच्या अवचित सानिध्यात वसलेले हे स्थान अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे. निसर्गरम्यतेच्या अविष्काराबरोबरच श्रध्दा दृढ करणाऱ्या या परिसराकडे भाविक आणि पर्यटकांचा विशेष ओढा असतो. दरवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठया उत्साहात साजरा होत असतो.


राजापूरवासियांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री देव धुतपापेश्वरची ही वार्षिक महाशिवरात्री उत्सव यावर्षी रविवार १५ फेब्रुवारी रोजी होत आहे. भल्या पहाटे तीन वाजता श्रींच्या नित्यपूजेने सुरूवात होणाऱ्या उत्सवाची सांगता दुसऱ्या दिवशी पहाटे भोवतीने होते. दिवसभर या ठिकाणी अबालवृध्द भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली असते. ही यात्रा म्हणजे अबाल वृध्दांना आनंदाची पर्वणी देणारा उत्साह आणि उल्हास वाढविणारा उत्सव आहे.
महाशिवरात्री उत्सवानिमित्त मंदिर परिसर आणि मंदिरात रंगरंगोटी करण्यात आली आहे. तर विविधरंगी पतांका व फुलांच्या माळांची चित्ताकर्षक आरास करण्यात आली आहे. यात्रेकरिता ज्या धोपेश्वर गावात ही यात्रा भरते त्या गावातील बारा वाड्यांतील ग्रामस्थ, राजापूर शहरातील नागरिक आणि परिसरातील गावांतील भाविक मोठया संख्येने हजेरी लावतात.
निसर्ग सानिध्यात अत्यंत रमणीय असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी आता पक्का रस्ता आणि वाहनांची सोय झाली असली तरी निशाणघाटी मार्गे पायी जाण्याची मजा काही औरच असते. उन्हाच्या कडाक्यात अंगावर घामाच्या धारा झेलत अनेक भाविक या मार्गे पायी जाणे पसंत करतात. आता या घाटीचे रूपांतरही नगर परिषदेने पक्या रस्त्यात केले आहे. धोपेश्वर शाळा ओलांडून तीव्र उतार संपताच पहिल्यांदा श्रीगणपतीचे मंदिर लागते. याच ठिकाणी मिडीबस, रिक्षा आणि खासगी गाडयांच्या पार्र्किंगची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी छोटेखानी असलेल्या या गणपती मंदिराबाहेर दुर्वा आणि बेलपत्राच्या जुड्या घेऊन स्थानिक गावातील महिला स्वागत करतात. गणेशाच्या दर्शनाने या यात्रेची भाविक सुरूवात करतात.
गणपती दर्शन घेऊन भाविक पुढे चालायला लागतात, पक्का रस्ता संपला की पुढे पायवाट लागते ही पायवाटही अलीकडे पेवर ब्लॉक ने बांधण्यात आली आहे. या पायवाटेवर आणि सुरूवातीला लागणाऱ्या नवलादेवी मंदिरापासून दोन्ही बाजुला दुकाने, हॉटेल्स मांडलेली दिसतात. या दुकानांमध्ये लाडू, आलेपाक पासून विविध खेळणी, फुगेवाले, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने लक्ष वेधून घेतात. ही दुकानांची रांग थेट मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचते. मंदिराच्या आवारात मात्र कोणत्याही प्रकारची दुकाने नसतात. ही पायवाट उतरत असतानाच दूरवरून वृक्षराजीत वसलेल्या श्री देव धुतपापेश्वर मंदिराच्या कळसाचे दर्शन घडते. या ऐतिहासिक सुप्रसिद्ध शिवकालीन मंदिराचे नुकतेच जतन व संवर्धन करण्यात आले. कोकणातील वास्तूकलेचा अतिशय सुंदर नमुना असलेले हे लाकडी वास्तुकलेलेने साकारलेले मंदिर पुन्हा त्याच जुन्या पद्धतीने संवर्धित करण्यात आलेले आहे.
मंदिराच्या महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर समोरच श्री धूतपापेश्वराचे देखणे देवालय आहे. मंदिराच्या डाव्या बाजुला वीरभद्राचे छोटेसे मंदिर आहे. तर उजव्या बाजुला उच्चस्थानी श्री कालभैरवाचे मंदिर आहे. बाजुला दीपमाळा व समोरच श्रींचा नगारखाना आहे. सभामंडपाच्या डाव्या बाजुला नैवेद्यासाठी स्वतंत्र खोली व धर्मशाळा आहे. सभामंडपातून जाताना डाव्या बाजुला नवग्रह मारूती यांच्या मूर्ती आहेत. तर डाव्या बाजुला नदी वाहत असून कोटीतीर्थ धबधब्यामुळे मंदिर परिसर विलोभनिय बनला आहे. येथील कोटीतीर्थ धबधब्याचं दृश्य हे पावसाळयात खूपच लोभसवाणं आणि मनाला आल्हाद देणारे असते. काळया पाशाणातून वाहणारे आणि खालील शिवपिंडीवर शतधारांनी कोसळणारा धबधबा भाविकांना खिळवून ठेवतो. दुरवरून आलेले भाविक धुतपापेश्वराचे दर्शन घेण्यापुर्वी मृडानी नदीतील पाण्याने हात पाय स्वच्छ धुवून पलिकडे असलेल्या दत्तमंदिरात श्री दत्तांचे दर्शन घेऊन पुलावरून धबधब्याचे आणि नयनरम्य परिसराचे दृश्य डोळयात साठवत दर्शनासाठी रांग लावतात.
सभागृहाच्या पुढे अष्टकोनी चौक असून ते अखंड काळया पाषाणातील नंदीची देखणी मूर्ती आहे. मंदिराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजुला पुर्ण आकाराच्या भालदार चोपदारांच्या मूर्ती आहेत. दरवाजातून आत गेल्यावर मुख्य गाभाऱ्यात स्वयंभु शिवलिंग आहे. शिवलिंगाचा वरील भाग तुटलेला असून सभोवताली भव्य साळकुंट आहे. गाभाऱ्यात श्रींचे शयनगृह आहे. तर मुख्य घुमटाचे डाव्या बाजुला श्री गजानन व उजव्या बाजुला श्रीविष्णु मूर्ती आहेत. मंदिराच्या पाठीमागे श्री कामेश्वराचे सुंदर दगडी मंदिर आहे. तर नदीपलीकडे श्री दत्तात्रयांचे पूर्ण जिर्णोध्दारीत मंदीर आहे. मंदिर परिसरातील दाट झाडी, कैलासचाफा आणि पारिजातकासारखी उंच झाडे मंदिर परिसराची तर शोभा वाढवितात शिवाय नव्याने बांधण्यात आलेला पुल, तटबंदी, रेलींग यामुळे मुळच्या सौंदर्यात अधीकच भर पडली आहे. शासनाच्या पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत या पुरातन मंदिराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.
यात्रेनिमित्त स्वयंभु असलेल्या श्री देव धूतपापेश्वराला सुवर्णलंकार व वस्त्रालंकारांनी सुशोभित केलेले असते. तर मंदिर गाभारा झेंडु आणि अन्य शोभिवंत फुलांनी सुशोभित केला जातो. या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर भाविकांनी एक वेगळीच अनुभुती मिळत असे. देवाला बेल फुल आणि नारळ वाहीला जातो. काही भाविक देवाला वस्त्रालंकारही अर्पण करतात.
गाभाऱ्याबाहेर भव्य सभामंडप आहे. या मंडपात दिवसभर भजन किर्तनादी कार्यक्रम सुरू असतात. पहाटे देवाची पुन्हा महापुजा, महानैवैद्य, मंत्रपुष्प, भोवती होऊन यात्रेची सांगता होते. यात्रेची सांगता माघ आमावस्येच्या पहाटे होत असते. त्यामुळे फाल्गून अर्थात शिमगोत्सवाची हाळी देत या यात्रेची सांगता होते. इथुन पुढे तालुक्यात शिमगोत्सवाची धूम सुरू होते.
श्री धूतपापेश्वराच्या वास्तव्यामुळेच या गावाला धोपेश्वर हे नाव पडले. हा गाव देवस्थानला इनाम असून गावांतील येणाऱ्या उत्पन्नातून व भक्तजनांनी दिलेल्या देणग्यांतून देवस्थानाचा खर्च चालतो. दररोज दोन्ही वेळ नैवैद्य, सांयकाळी महापूजा, आरती, पालखी-प्रद्रक्षिणा असे कार्यक्रम होत असतात.
राजापूर शहरानजीकच्या धोपेश्वर येथे हे दर्शनिय स्थान आहे. या स्थानाला निसर्गदेवतेचा भरभरून वरदहस्त लाभला आहे. समृध्द निसर्गामुळे ते अतिरमणीय झाले आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरही असलेले बरेच लोक भक्त असून त्यांना या स्थानाबद्दल आकर्षण तर आहेच, परंतु कोणी नवागतही या स्थानी सहजपणी आला तर तो भाराऊन जात नतमस्तक होतो. त्याचा भक्तिभाव जागृत व्हावा, असेच हे शिवस्थान आहे.
आख्यायिका:
राजापूरच्या परिसरात निळोबा भट नावाचा एक गरीब माणूस राहत होता. परिस्थितीने गरीब असूनही जे काही मिळेल त्यावर तो समाधानी होता. काशीविश्वेवर दर्शन आणि गंगास्नान करण्यास हे शिवभक्त दरवर्षी काशीला जात असत. परंतु वृद्धापकाळामुळे पुढे इतक्या दूर जाववेना.
त्यांच्याकडे एक गाय होती. तिने अचानक दूध देणे बंद केल्यामुळे त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. रानात जाऊन एके ठिकाणी ती गाय झाडाखाली पान्हा सोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गायीच्या गुराख्याने रागातच त्या खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्या खडकाचा एक खडपा उडून विशालगडजवळच्या कासर्डे गावी जाऊन पडला, आणि त्याचे ‘कपालेश्वर’ लिंग झाले. मूळ खडक त्याच स्थानी राहिला. निळो भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग आढळले. त्यांना खूप वाईट वाटले कारण शिवलिग भंग झाले त्याला आपणच कारणीभूत आहोत असे त्यांना वाटले.आजही ते स्वयंभू शिवलिगं तुटलेलेच आहे.
खडक फोडल्यावर ती गाय पळू लागली. तिने मंदिराच्या शेजारील डोहात उडी घेतली (कोटीतीर्थात). निसीम्म शिव भक्त असलेले निळोबा भटांना खुप वाईट वाटले शिवलिगं भंग आणि पवित्र गाईचा मृत्यू यास आपणच जबाबदार आहोत असे म्हणून पापाचे प्रायश्चित म्हणून निळोबाही धावले आणि त्यांनीही कोटीतीर्थात देहविसर्जन केले. अशी आख्यायिका सांगितली जाते.