कराड | Sahyadri Tiger Reserve आणि Last Wilderness Foundation यांच्यात आज कराड येथे सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराचा उद्देश सह्याद्री परिसरात समुदाय-आधारित संवर्धन व मानव–वन्यजीव सहअस्तित्व अधिक बळकट करणे हा आहे.
हा करार श्री. तुषार चव्हाण, भा.व.से., क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र यांच्या वतीने तसेच सौ. विद्या वेंकटेश, संचालक, लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आला.
उत्तर पश्चिम घाटात स्थित असलेले सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र हे जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त पश्चिम घाट जैवविविधता हॉटस्पॉटचा भाग असून यामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य व राधानगरी वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश आहे. या परिसरात व्याघ्र, बिबट्या, गौर, अस्वल, सांबर, रानकुत्रा तसेच पश्चिम घाटातील अनेक दुर्मिळ व स्थानिक प्रजाती आढळतात.
या सामंजस्य कराराअंतर्गत बफर व काठावरील गावांमध्ये समुदाय सहभाग वाढवणे, संवर्धनाविषयी जनजागृती, क्षमतावृद्धी, मानव–वन्यजीव संघर्ष निवारण तसेच स्थानिक पातळीवर संरक्षणासाठी सहकार्य यांवर भर देण्यात येणार आहे.
लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशन ही कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नोंदणीकृत (कलम ८) स्वयंसेवी संस्था असून ती वन्यजीव संवर्धन, समुदाय सहभाग, संवर्धन शिक्षण आणि मानव–वन्यजीव सहअस्तित्वाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. सदर संस्थेने यापूर्वी विविध व्याघ्र राखीव क्षेत्रांमध्ये वनविभागासोबत काम केले असून, Pench Tiger Reserve आणि Kanha Tiger Reserve यांसारख्या व्याघ्र राखीव क्षेत्रांमध्ये समुदाय सहभाग, संवर्धन जनजागृती आणि इको-डेव्हलपमेंट उपक्रम राबविले आहेत.
क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र
“सह्याद्रीसारख्या विस्तीर्ण व संवेदनशील भूप्रदेशात दीर्घकालीन संवर्धन यशस्वी होण्यासाठी स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामंजस्य करारामुळे सहअस्तित्वाची यंत्रणा अधिक सक्षम होईल तसेच गाव पातळीवरील सहभागात्मक संवर्धनाला चालना मिळेल,” असे श्री. तुषार चव्हाण, भा.व.से., क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र यांनी सांगितले.
लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशन
“व्याघ्र राखीव क्षेत्र प्रशासन व स्थानिक समुदायांसोबत काम करताना आम्हाला असे आढळून आले आहे की, समुदाय जेव्हा संवर्धन प्रक्रियेचा भाग बनतात तेव्हा परिणाम अधिक सकारात्मक दिसून येतात. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रासोबत भागीदारी करताना आम्हाला पश्चिम घाटात समुदाय-आधारित संवर्धन मॉडेल विकसित करण्याची संधी मिळेल,” असे सौ. विद्या वेंकटेश, संचालक, लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशन यांनी नमूद केले.
या सामंजस्य कराराअंतर्गत लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशन कडून समुदाय-आधारित संवर्धन व मानव–वन्यजीव सहअस्तित्व कार्यक्रम राबविण्यात येणार असून, सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र प्रशासनाकडून आवश्यक परवानग्या, समन्वय व क्षेत्रीय सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व उपक्रम कायदेशीर तरतुदी, एनटीसीए मार्गदर्शक तत्त्वे व महाराष्ट्र वन विभागाच्या नियमांनुसार राबविण्यात येतील.
सदर करार वर क्षेत्र संचालक तुषार चव्हाण , उपसंचालक किरण जगताप, उपसंचालक स्नेहलता पाटील , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनक्षेत्रपाल संग्राम गोडसे तसेच
लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशनचे विद्या व्यंकटेश, व केदार भिडे उपस्थित होते.
हा सामंजस्य करार १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या कालावधीसाठी वैध राहणार आहे.












