अजितदादांचा शब्द सुनेत्रा पवारांनी केला पूर्ण; आ. निकम यांच्या कन्येच्या विवाहाला राहिल्या उपस्थित

 चिपळूण (संतोष सावर्डेकर): नाती केवळ रक्ताची नसतात, ती विश्वासाची आणि शब्दाचीही असतात, याची प्रचिती नुकतीच सावर्डे येथे पाहायला मिळाली. सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय गोविंदराव निकम यांची नात आणि चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांची कन्या चि.सौ.का. मुक्ता व अक्षय शिंदे यांचा विवाह सोहळा सावर्डे-वहाळफाटा येथील सह्याद्रीच्या प्रांगणात अत्यंत शाही थाटात, मात्र तितक्याच भावनिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी लावलेली आवर्जून उपस्थिती.

स्वर्गीय अजितदादा पवार आणि निकम कुटुंबाचे नाते पिढ्यानपिढ्यांचे आणि जिव्हाळ्याचे राहिले आहे. आमदार शेखर निकम यांनी आपल्या लेकीच्या लग्नाचे निमंत्रण देताना दादांनी या सोहळ्याला येण्याचा शब्द दिला होता. आज अजितदादा भौतिकदृष्ट्या उपस्थित नसले तरी, त्यांचा तो शब्द आणि दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सावर्डे येथे धाव घेतली. आपल्या कुटुंबातीलच एका सदस्याच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्याप्रमाणे त्यांनी मुक्ता आणि अक्षय या नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. हा क्षण उपस्थित निकम कुटुंबीय आणि उपस्थितांसाठी अत्यंत भावूक करणारा ठरला. दादांचा शब्द वहिनींनी पाळला, अशा भावना यावेळी व्यक्त होत होत्या.

सुनेत्रा पवार यांचे सावर्डे येथील हेलिपॅडवर आगमन होताच अनिरुद्ध निकम आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. विवाह मंडपात जाण्यापूर्वी त्यांनी स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या ‘स्मृतिगंध’ या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन जुन्या स्मृतींना उजाळा दिला. या विवाह सोहळ्याला राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, आमदार प्रकाश सुर्वे, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली यांसह राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. मतदारसंघातील जनसमुदायाने या सोहळ्याला अलोट गर्दी केली होती, ज्यामुळे सावर्डे परिसर जनसागराने न्हाऊन निघाला होता. राजकीय क्षेत्रातील मतभेद बाजूला ठेवून सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावल्याने, हा विवाह सोहळा केवळ कौटुंबिक नव्हे तर सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरला.