शेतकरी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

मसुरे | झुंजार पेडणेकर : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये वैयक्तिक तसेच शेतकरी गटाना देखील विविध अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी 35% व दहा लाखापर्यंत अनुदान उपलब्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी वाढत जाणारी
फळझाडे लागवड पाहता आंब्या व्यतिरिक्त काजू ,नारळ ,कोकम, करवंद, जांभूळ यासारख्या फळांवर छोटे उद्योग उभारण्यासाठी योजना फलदायी ठरत आहे असे प्रतिपादन मालवण तालुका कृषी अधिकारी श्री अमोल करंदीकर यांनी केले. तालुका कृषी अधिकारी मालवणच्या वतीने कन्या शाळा सभागृह येथे मालवण तालुक्यातील इच्छुक शेतकरी व शेतकरी गट यांच्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ब्रँडिंग साठी देखील 50% पर्यंत अनुदान उपलब्ध होऊ शकते. योजनेमध्ये जिल्हा संशोधन व्यक्तींकडून इच्छुक शेतकऱ्यांचे प्रकल्प अहवाल व बँकेकडील कर्जासाठीची कागदपत्रे तयार करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मालवण यांनी तालुकास्तरीय कार्यशाळेत बोलताना केले.
यावेळी योजनेचे क्षेत्रीय अधिकारी श्री योगेश वालावलकर यांनी योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. एचडीएफसी बँकेचे बँक अधिकारी श्री सावंत यांनी कर्ज प्रक्रिया बाबत माहिती दिली.
या योजनेचा लाभ घेतलेले श्री सुरेश मापारी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून योजना उपयुक्त असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत श्रीमती अरिता तेंडुलकर, श्रेया सामंत तसेच श्री साळस्कर यांनीही योजनेबाबत शंका समाधान केले.
मंडळ कृषी अधिकारी हुसेन हंबार्डेकर यांच्यासोबत उप कृषी अधिकारी, तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी तसेच 45 इच्छुक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित जि प सदस्य श्रीमती हडकर, पंचायत समिती सदस्य श्रीमती कांबळी , माजी सभापती श्री अजिंक्य पाताडे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.