वायंगणी गाव गुरुवारी पुन्हा गजबजला

आचरा–अर्जुन बापर्डेकर :गावाबाहेर वसवलेल्या ग्रामदेवता रवळनाथाने गुरुवारी दुपारी गावभरण्याचा कौल दिला आणि देवस्वारीचे वाजतगाजत गावात आगमन झाल्यावर वायंगणी गाव भरण्यास सुरुवात झाली.गेले तीन दिवस गावपळणीमुळे सुनसान झालेले वायंगणी गाव सायंकाळ पर्यंत पुन्हा गजबजून गेले.

सोमवारी पहाटे देव वेशीबाहेर गेल्यानंतर दुपारनंतर ग्रामस्थांनी पाळीव जनावरांसह गाव सोडला होता. देवस्वारी असलेल्या चिंदर सडेवाडी ठिकाणी बहुतांशी वायंगणी ग्रामस्थांनी वस्ती केली होती. गुरुवारी सकाळी वेशीबाहेर वसलेल्या ठिकाणी देवाला गावभरण्याचा कौल घेण्यात आला. देवाने कौल दिल्यावर वायंगणी ग्रामस्थांची लगबग वाढली होती. दुपारी गोसावी वाडीतील ग्रामस्थांच्या सौजन्याने महाप्रसाद झाल्यावर अडीज वाजण्याच्या सुमारास देवास सांगणे करत वाजतगाजत रवळनाथ मंदिरात आणण्यात आले. त्यानंतर गाव भरण्यास सुरुवात झाली. गेले तीन दिवस सडेवाडी गोसावी वाडी येथे

दिंडी भजन,दशावतार, मुलांचे गुणदर्शनपर कार्यक्रम आदींनी तीन रात्री जागवल्या होत्या. तर कालावल खाडी लगत राहणाऱ्या सडयेवाडी ग्रामस्थांनी पारंपरिक खेळांबरोबरच, गप्पांच्या मैफिलीत तीन दिवस मन रमवले होते. दुपार नंतर देवस्वारीचे गावात आगमण झाल्यावर वायंगणी गावभरण्यास सुरुवात झाली. सडयेवाडी येथे ग्रामस्थांनी तीन दिवसासाठी उभे केलेले संसार मोडून पुन्हा आपल्या मुळ घरी जाण्याची धावपळ सुरुझाली होती.सायंकाळी उशिरापर्यंत दूर वरुन ग्रामस्थ गावात येत होते.