सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची निवड; संतोष बोरकर जिल्हाध्यक्ष पदी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटीबद्ध असलेल्या ‘सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघा’ची सन २०२६ सालासाठीची नवीन जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सरचिटणीस सतिशदादा मेटकरी व केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाशदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नावाची अधिकृत प्रत रत्नागिरी विभाग नियंत्रकांना सादर करण्यात आली असून, यावेळी विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या नवीन कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्ष पदी संतोष बोरकर यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्ष म्हणून योगेश भोसले, संजिव बने आणि राजापूर आगाराचे तेजस रायबागकर यांची नियुक्ती झाली आहे. संघटनेच्या कायदेशीर बाबींसाठी विधीतज्ञ म्हणून ॲड. संकेत लकेश्री काम पाहणार आहेत. अन्य महत्त्वाच्या पदांमध्ये लांजा आगाराचे वसंत कांबळे (सचिव), गुहागर आगाराचे सतिश चव्हाण (सहसचिव), विभागीय भांडारचे अक्षय मांडवकर (खजिनदार) आणि मंडणगड आगाराचे विलास मोरे (सहखजिनदार) यांचा समावेश आहे. तसेच कार्याध्यक्ष पदी जयप्रकाश दळवी, जिल्हा संघटक म्हणून विजय गोरे, प्रसिद्धी सचिव म्हणून मंडणगडचे महेंद्र विखारे आणि महिला संघटक म्हणून राजापूर आगाराच्या सौ. दुर्गा मोर्लेकर यांची निवड झाली आहे.

या कार्यकारिणीत संघटक सचिव पदी अंकुश शिंदे यांची निवड झाली असून, सदस्य म्हणून मंगेश गोवळकर, वेताळ चव्हाण, शशिकांत कांबळे, संतोष आबादार, संतोष आरवकर आणि निलेश महादेव आखाडे यांचा समावेश करण्यात आला आहे. विभाग नियंत्रकांनी या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कर्मचारी हितासाठी संघटना अधिक मजबुतीने कार्य करेल आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील, असा विश्वास यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संतोष बोरकर व इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून संघटनेच्या शिलेदारांचे कौतुक होत आहे.