लाखो रुपये खर्च करून फक्त कचऱ्याला आग

आडारी डम्पिंग ग्राउंड येथील कारभारावर स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांचा तीव्र संताप

ठेकेदाराच्या कारभाराचा केला पंचनामा : कामगिरी सुधारण्यासाठी 15 दिवसांची डेडलाईन

अमित खोत | मालवण : आडारी कचरा डम्पिंग ग्राउंड येथे कचरा वर्गीकरण, कंपोष्ट खत निर्मिती व परिसर स्वच्छता यासाठी वर्षाला 50 लाख पेक्षा जास्त खर्च मालवण नगर परिषदेच्या माध्यमातून होत असताना या ठिकाणी प्रत्यक्षात केवळ कचऱ्याला आग हे दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारची खत निर्मिती होत नाही तसेच परिसरही घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या संपूर्ण कारभाराचा स्पॉट पंचनामा करत स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांनी ठेकेदाराला चांगलेच सुनावले. पंधरा दिवसात सर्व कारभार सुधारा अन्यथा कारवाईला तयार रहा. अशी डेडलाईनच ठेकेदाराला देण्यात आली आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ठेकेदाराच्या करार पत्र नुसार 21 कामगारांची नोंद असताना प्रत्यक्षात सात ते आठ कामगारांचाच वावर दिसून येत असून हजेरीपटावर मात्र ज्यादा कामगारांची नोंद होत असल्याचे सभापती पूनम चव्हाण यांच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. याबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे चुकीचे काम करून नगरपरिषदेची फसवणूक करण्याचे काम होत असेल तर या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचाही प्रस्ताव तयार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांनी नगरपरिषद स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंड ची पाहणी केली. या ठिकाणी आल्यानंतर केवळ कचऱ्याला लागलेली आग हेच दिसून येते. कोणत्याही प्रकारची कंपोष्ट खत निर्मिती होत नाही. नेमका कोणता कचरा वर्गीकरण केला जातो आणि त्याचे काय होते? नेहमीच कचरा डम्पिंग ला आग कशी लागते? कर्मचारी नेमके काम काय करतात? खोट्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची हजेरी का लावली जाते? परिसराची स्वच्छता ठेवण्याचे काम असताना ते काम का होत नाही? असे अनेक सवाल सभापती पूनम चव्हाण यांनी उपस्थित केले. या सर्व कारभाराबाबत ठेकेदाराला फोन करूनही त्यांनी चांगलेच खडसावले. कारभार सुधारा नाहीतर कारवाईला तयार राहा. सभापतींचा रुद्रावतार पाहून पंधरा दिवसात सर्व काही योग्य पद्धतीने करून देतो मला पंधरा दिवसांचा वेळ द्या असे ठेकेदारांनी सांगितले आहे.

स्वच्छतेची गुढी उभारण्याचा संकल्प करा

काही वर्षांपूर्वी हे डम्पिंग ग्राउंड चांगल्या प्रकारे ठेवण्यात येत होते. योग्य पद्धतीने या ठिकाणी काम केले जात होते. मात्र गेल्या काही वर्षात घाण दुर्गंधी याचे साम्राज्य संपूर्ण परिसरात पसरले आहे. नागरिकांच्या आरोग्यालाही यामुळे धोका निर्माण होण्याची भीती आहे. तरी याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी 15 दिवसात कारभार सुधारून स्वच्छतेची शपथ घेत या ठिकाणी स्वच्छतेची गुढी उभारावी. अशाही भावना सभापती पूनम चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

फोटो : आडारी कचरा डम्पिंग ग्राउंड येथे पाहाणी करताना आरोग्य सभापती पुनम चव्हाण व अधिकारी. (अमित खोत, मालवण)