मुंबई गोवा महामार्गावर धनावडे शेती फार्म येथील घटना
लांजा (प्रतिनिधी); मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने मुंबई गोवा महामार्गा लगतच्या सुरक्षा भिंतीला व दिशादर्शक फलकाला जोरदार धडक देऊन महामार्गावर पलटी झाल्याने केबिनखाली चिरडून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास धनावडे शेती फार्मसमोर घडला.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक जितेश रामजी मसालिया (वय ३२, रा.शेख, टिंबो कोली वास, ता.अंजार, जि. कच्छ, गुजरात) हा आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रक (क्र.जीजे.१२.बीझेड.२९१७) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. ट्रक लांजा तालुक्यातील धनावडे शेती फार्मसमोर आला असता रस्ता सरळ व वळणाचा असतानाही त्याने दुर्लक्ष करून ट्रक भरधाव वेगात चालवला. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीला व दिशादर्शक फलकाला जोरदार धडकला. धडकल्यानंतर ट्रक कलंडल्याने चालकाचा केबिन खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक केबिन मध्ये अडकून पडल्याने जेसीबीच्या सहाय्याने ट्रकची केबिन हलवून त्याला बाहेर खेचून काढण्यात आले.
या प्रकरणी ट्रक चालक जितेश मसालिया याच्याविरोधात भा.न्या.सं. कलम १०६(१), २८१, १२५ (अ) व (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड या करत आहेत.













