आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या बक्षिस वितरण प्रसंगी प्रतिपादन
राजापूर (वार्ताहर): कोकण हा प्रतिभावंतांचा प्रदेश आहे. कोकणातील विद्यार्थी कष्टाळू आहेत. या कष्टाळू विद्यार्थ्यांच्या व कोकणाच्या कातळावर शिक्षणरुपी गंगा आणणाऱ्या महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी म्हणून सदैव सोबत राहू असे सांगताना आमदार किरण सामंत यांनी महाविद्यालयासाठी ५ कोटी रू.चा भरघोस निधी आबासाहेब मराठे महाविद्यालयाला जाहीर केला.
येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किरण सामंत उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी महाविद्यालयांच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मरमरून कौतुक केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार बाबा परीट यांनी ओघवत्या वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे उद्बोधन केले. रयत शिक्षण संस्थेला कर्मवीरांच्या निःस्पृहतेचा व त्यागाचा समृद्ध वारसा लाभला असून मानवता हा सारा धर्म आहे अशी शिकवण देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे व कर्मवीरांच्या विचारांचे खरे पाईक आपण आहात असे सांगत आई-वडिलांच्या व आशीर्वादाने गुरुजनांच्या आशीर्वादाने अभ्यासू वृत्ती जोपासून आयुष्याचा सोनं करूया असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्याना केले.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालय विकास समिती सदस्य रमेश मराठे, सौ. रश्मी मराठे, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद मोहरकर, जिमखाना विभाग प्रमुख व कला विभागाचे उप्याचार्य डॉ. संजय मेस्त्री, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अतुल भावे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. हेमंत अकोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिमखाना विभागातील सर्व सदस्य, महाविद्यालयातील सर्व सहकारी प अध्यापक वृंद, कर्मचारी व सेवक यांनी परिश्रम घेतले.













