४ रोजी गाथा शिवरायांची तर ५ रोजी वाहनफेरीचे आयोजन
चित्ररथ मिरवणूक, पालखी सोहळयाचे आयोजन
राजापूर (वार्ताहर): प्रतिवर्षाप्रमाणे येथील शिवस्मृती मंडळ राजापूरच्या वतीने फाल्गुन कृष्णपक्ष तृतीया शुक्रवर दि. ०६ मार्च रोजी जवाहरचौक येथिल शिवस्मारकात तिथीनुसार शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त बुधवार दि. ४ मार्च ते ६ मार्च या दरम्यान वाहन फेरी, चित्ररथ मिरवणूक, युध्दकला प्रात्यक्षिक व शिवचरित्रावरील व्याख्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची संगीत गौरव गाथा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. ४ मार्च रोजी सायं. ७ ते १० या वेळात गाथा शिवरायांची या अंतर्गत स्थानिक कलाकारांचे शिवचरित्रावरील सादरीकरण केले जाणार आहे. गुरूवार दि. ०५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता वाहन फेरी काढली जाणार आहे. वाहन फेरी एस. टी. डेपो येथुन प्रारंभ होवून पेट्रोलपंप, मेन रोड, जवाहरचौक- छत्रपती संभाजी महाराज पेठ मार्गे वरचीपेठ राजीव गांधी स्टेडिअम बंदरधक्का, छत्रपती शिवाजी महाराज पथ, कै. वैशंपायन गुरूजी पुल मार्गे गुजराळी, चापडेवाडी, ओगलेवाडी, दिवटेवाडी, साखळकरवाडी, खडपेवाडी मार्गे पुन्हा शिवस्मारक येथे सांगता होणार आहे. रात्रौ ८ वाजता कै. न. चि. अपमार्जने आणि आफळे बुवा यांचे शिष्य राष्ट्रीय किर्तनकार ह. भ. प. संदिप मांडके बुवा पुणे यांचे शिवचरित्रावरील किर्तन होणार आहे.
शुक्रवार दि. ०६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता शिवकालीन चित्ररथ देखाव्यांसह छत्रपती शिवरायांचा पालखी सोहळा होणार आहे. यामध्ये पालखी, ढोलपथके, लेझीम पथक, झांज पथक यांसह शिवप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत.
तरी यावेळी सर्व शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवस्मृर्ती मंडळ राजापूरच्या वतीने करण्यात आले आहे.










