मृत्यूच्या जाळ्यातून ‘नागिणी’ची सुटका; सर्पमित्राच्या माणुसकीने मिळाले जीवदान!

मसुरे | झुंजार पेडणेकर : ‘ती’ जाळ्यात अडकली होती……आणि सुटका करण्याच्या नादात ‘ती’ आणखीनच गुरफटत गेली……. जीवाच्या आकांताने साधारण दोन दिवसापेक्षा जास्त कालावधी ‘ती’ या जाळ्यात अडकुन होती…. अखेर जाळ्यातून ‘तिची’ सुटका करण्यात आली आणि पाणी पाजून तसेच शरीरावरील जखमांवरती औषधोपचार करून ‘तिला’ पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही ‘ती’ म्हणजे जाळ्यात अडकलेली विषारी नागिण! कांदळगाव देऊळवाडी येथील सुरज परब यांच्या घरालगत लावून ठेवलेल्या जाळ्यात दोन दिवसांपासून ही नागीण अडकून होती. याबाबतची बातमी कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांना मिळताच त्यांनी लागलीच त्या ठिकाणी धाव घेतली. प्रथम जाळ्यात गुरफटलेल्या नागिणीची त्यांनी जाळे कापून सुटका केली. जाळ्यातून सुटका करून घेण्यासाठी त्या नागिणीने शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे तिच्या शरीरावर जाळ्याच्या धाग्यानी असंख्य जखमा झाल्या होत्या. स्वप्नील परुळेकर यांनी या नागिणीला प्रथम पाणी पाजले आणि त्यानंतर झालेल्या जखमांवर हळद लावली. थोडीशी ही नागिण सावध होताच तिला नैसर्गिक अधिवासात सोडले. मरणासन्न अवस्थेत असलेल्या या नागिणीला जीवदान दिल्यामुळे सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांचे कौतुक होत आहे. निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या एका नागिणीला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढण्यात कांदळगावच्या सर्पमित्राला यश आले आहे. जाळ्यात अडकून जखमी झालेल्या या नागिणीवर मायेने उपचार करून तिला जीवनदान देणाऱ्या स्वप्नील परुळेकर यांच्या या धाडसाची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात होत आहे.