राजापूर उपविभागिय कार्यालयाच्या वतीने 1 ते 7 ऑगस्ट या कालाधीत महसूल सप्ताहाचे आयोजन

राजापूर व लांजा तहसीलदार क्षेत्रात विविध उपक्रमांनी साजरा होणार महसूल सप्ताह
तहसीलदार सौ. शीतल जाधव यांची माहिती 

राजापूर | प्रतिनिधी : महसूल प्रशासनाच्या वतीने मंगळवार 1 ऑगस्ट ते सोमवार 7 ऑगस्ट या कालावधीत उपविभागिय कार्यालय राजापूर यांच्या वतीने राजापूर व लांजा तसीलदार कार्यालयाच्या अंतर्गत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सात दिवसात राजापूर महसूल प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे व जनताभिमुख योजनांचा प्रचार आणि प्रसार अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तशी माहीती तहसीलदार सौ. शीतल जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

या महसूल सप्ताहाचा शुभारंभ मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी राजापूरात नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहात सकाळी 11 वाजता होणार असून याचा सांगता समारंभ 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गणेश मंगल कार्यालय लांजा येथे होणार असल्याचे सौ. जाधव यांनी सांगितले.

राजापूर तहसीलदार कार्यालयाबरोबरच तालुक्यातील 12 मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रात या अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महसूल प्रशासनाशी निगडीत सर्व योजनांची माहिती देतानाच विविध प्रकारचे दाखले वितरण, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत नवीन प्रकरणे मंजूर झालेल्या लाभार्थींना लाभ देणे, सातबारा दुरूस्ती करणे, प्रलंबीत खटले निकाली काढणे व निकाली झालेल्या खटल्यांचे निकालपत्रक वाटप करणे, रेशनकार्ड संबधित सर्व कामांचा निपटारा करणे, मतदार नोंदणी अभियानांतर्गत सर्व नोंद घेणे, मतदार नोंदणी करणे, ओळखपत्र वाटप करणे अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी या सप्हातात केली जाणार असल्याचे सौ. जाधव यांनी सांगितले.

मंगळवारी 1 रोजी सप्ताहा शुभारंभ व महसुल दिन साजरा केला जाणार आहे, 2 रोजी सर्व मंडळ स्तरांवर युवा संवाद कार्यक्रम, 3 रोजी एक हात मदतीचा सर्व मंडळ स्तर व तालुका स्तरावर, 4 रोजी जनसंवाद कार्यक्रम, 5 रोज सैनिकहो तुमच्यासाठी हा तालुका स्तरावर उपक्रम, 6 रोजी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संवाद तर 7 रोजी लांजा येथे सांगता समारंभ होणार असल्याचे सौ. जाधव यांनी सांगितले.

याप्रसंगी तहसीलदार सौ. दिपाली पंडीत, अव्वल कारकून मंगेश परांजपे, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष रवींद्र नागरेकर आदींसह महसूलचे कर्मचारी उपस्थित होते.