हणखणे भागात दाखल : वनविभाग सतर्क
बांदा : प्रतिनिधी
बांदा, मडूरा, इन्सुली परिसरात गेले तीन महिने ठाण मांडून राहिलेला ओंकार हत्ती पुन्हा बांदा परिसरात येण्याच्या तयारीत आहे. सध्या नेतर्डे लगत हणखणे परिसरात ओंकार स्थिरावला असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. सध्या काजू हंगाम असल्याने या वृत्ताने स्थानिक शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. हत्तीला वनविभागाने पुन्हा दोडामार्ग च्या दिशेने परतावे अशी मागणी स्थानिक करत आहेत.
ओंकार हत्तीने ११ सप्टेंबर दरम्यान दोडामार्ग तालुक्यातून नेतर्डे गावात प्रवेश केला होता. त्यानंतर मोपा, तांबोसे येथून तो कास, मडुरा गावात सुमारे तीन आठवडे ठाण मांडून होता. त्यानंतर इन्सुली, वाफोली गावात हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातला. यादरम्यान ओंकार हत्तीने भातशेतीसह माड आणि पोफळी बागायतीचे मोठे नुकसान केले होते.
आज सासोली हून ओंकार हत्ती हणखणेच्या दिशेने रवाना झाला. तेथून तो नेतर्डेच्या दिशेने पुन्हा बांदा परिसरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी, काजू बागायतदार मध्ये चिंतेचे वातावरण आहे.













