साटेली भेडशी येथील BSNL एक्सचेंजमध्ये धाडसी चोरी; ३८ हजारांचे साहित्य लंपास

दोडामार्ग | प्रतिनिधी :दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील बी.एस.एन.एल. (BSNL) एक्सचेंज ऑफिसमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ३८ हजार ४०० रुपये किमतीचे तांत्रिक साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की २३ मार्च २०२६ च्या सायंकाळी ५:३० ते २४ मार्च २०२६ च्या सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी एक्सचेंज ऑफिसचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तिथे स्क्रॅपसाठी बाजूला काढून ठेवलेले मौल्यवान साहित्य लंपास केले. यामध्ये C-DOT कंपनीचे २२ मदरबोर्ड्स (किंमत २६,४०० रुपये) आणि ६० कार्ड्स (किंमत १२,००० रुपये) अशा एकूण ३८ हजार ४०० रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे.

 

याबाबत एक्सचेंजचे अधिकारी प्रल्हाद रामचंद्र पुण्यवंत (वय ५४, रा. सावंतवाडी) यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद कांबळे, दोडामार्गचे पोलीस निरीक्षक श्री. हेमचंद्र खोपडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

तपासासाठी तातडीने फॉरेन्सिक व्हॅनला (न्यायवैद्यक पथक) पाचारण करण्यात आले असून ठसे तज्ज्ञांमार्फत पुरावे गोळा करण्यात आले आहेत. हा गुन्हा ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षापात्र असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र पाटील करत आहेत. वारंवार होणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.