पणतुर्ली घोटगाची वाडी येथे महिलेला चौघींकडून मारहाण; दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

दोडामार्ग (प्रतिनिधी):

दोडामार्ग तालुक्यातील पणतुर्ली घोटगाची वाडी येथे एका ६० वर्षीय महिलेला घरात शिरून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चार महिलांविरुद्ध दोडामार्ग पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला उल्हास घोगळे (वय ६०, रा. पणतुर्ली घोडगाचीवाडी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते ९:२० च्या सुमारास ही घटना घडली. संशयित आरोपी उषा पंढरीनाथ मळीक (५५), स्नेहल संदेश मळीक (३०), माया रुपेश मळीक (४५) आणि पूजा समीर मळीक (३०) (सर्व राहणार मुंबई, सध्या मुक्काम पणतुर्ली घोडगाचीवाडी) यांनी फिर्यादीच्या घरात शिरून त्यांना शिवीगाळ केली.

यावेळी आरोपी उषा मळीक यांनी फिर्यादीच्या डोक्यावर बांबूच्या दांड्याने प्रहार करून दुखापत केली, तर इतर तिन्ही आरोपींनी फिर्यादीला हाताला धरून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर, फिर्यादीच्या पतीलाही अशाच प्रकारे मारून टाकण्याची धमकी आरोपींनी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी आरोपींविरुद्ध BNS ३३३, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ व्ही. व्ही. केरकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.