दापोली l प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात भोंदू बाबाचे प्रकरण गाजत असतानाच मूळचा दापोली तालुक्यातील रहिवासी असलेला आणि सध्या विरारमध्ये राहणाऱ्या एका भजन कीर्तनात रमणाऱ्या भोंदू बुवाने आपल्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डिसेंबर 2025 मध्ये घडलेल्या या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर या भोंदू बुवा विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र असे असले तरी अजूनही या भोंदू बुवावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने सर्वत्र आश्चर्य कारक चर्चा सुरु आहे.
पीडित मुलगी लग्नासाठी म्हणून दापोली तालुक्यातील आपल्या गावी आली होती.लग्नानंतर मी तुला घरी सोडतो असे सांगून त्या भोंदूने तिला आपल्या सोबत विरारला नेले.नातेवाईक असल्याने ती त्याच्यासोबत गेली.मात्र त्याने तेथे तिचा विनयभंग केला.याबाबत तिने घरी सांगणार असल्याचे सांगताच त्याने तिची माफी मागितली.व त्यानंतर त्याने पुन्हा तिच्याशी जावळीक साधण्याचा प्रयत्न केला.1 डिसेंबर आणि 2 डिसेंबर 2025 रोजी आपला विनयभंग झाल्याचे तिने 15 डिसेंबर रोजी विरार पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
विरार पोलिसांनी त्या भोंदू बुवा विरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस 2023 अंतर्गत कलम 74,115(2), 351(2) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पॉक्सो अंतर्गत कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजूनही या भोंदू विरोधात कारवाई झालेली नसल्याचे पीडितेच्या पालकांचे म्हणणे आहे.त्यांनी विरार पोलिसांची भेट घेऊन त्वरित कारवाईची मागणीही केली आहे.आता या प्रकरणी दोषीवर कधी व कोणती कारवाई होणार याकडे मुंबईसहीत संपूर्ण दापोली तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.












