महावीर जयंतीनिमित्त खेडमध्ये मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

खेड (प्रतिनिधी) : महावीर जयंतीच्या निमित्ताने चिराग मार्बल्स तर्फे ३१ मार्च २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर इन्फिगो आय केअर हॉस्पिटल येथे पार पडत असून नागरिकांकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी मा. शैलेश सणस, मुख्याधिकारी श्री महादेव रोडगे, खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण तसेच जैन तेरापंथ युवक परिषद जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ उर्फ धीरज जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना मान्यवरांनी नेत्र आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा शिबिरांच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या त्रिदिवसीय शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्र तपासणी करण्यात येत असून आवश्यक रुग्णांची शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.