खेड (प्रतिनिधी) : खेड नगर परिषदेच्या ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने नगरपरिषद परिसरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी भाजपा गटनेते रहीम सहिबोले, नवनिर्वाचित नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर तसेच नगरसेविका सौ. स्वप्नाली राकेश चव्हाण यांनी नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेढे खाऊ घालत वर्धापन दिनाचा आनंद साजरा केला.
खेड नगर परिषदेची स्थापना १९४० साली झाली असून आज या नगरपरिषदेला ८६ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने भाजप नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी सर्व खेडवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
इतिहासाच्या पार्श्वभूमीवर पाहता, १९१४ ते १९१९ दरम्यान पहिले महायुद्ध तर १९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध झाले. ब्रिटिश काळात पोलीस, न्यायव्यवस्था आणि लष्करी दल यांसारख्या विविध यंत्रणांची स्थापना करण्यात आली. खेड तालुक्यातील शिवतर हे गाव लष्करी सेवेसाठी ओळखले जाते. या गावातील अनेक तरुण आजही देशसेवेत कार्यरत असून ‘मिलिटरीचे गाव’ म्हणून त्याची वेगळी ओळख आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात शिवतर गावातील सुमारे २३४ जवान शहीद झाले होते. त्यांच्या बलिदानानंतर ब्रिटिशांनी गावकऱ्यांना त्यांच्या अपेक्षा विचारल्या असता, ग्रामस्थांनी खेड येथे नगरपरिषदेची स्थापना करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत १९४० साली खेड नगर परिषदेची स्थापना करण्यात आली.
आज ८६ वर्षांचा प्रवास पूर्ण करताना खेड नगरपरिषद शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, या वर्धापन दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी शहरवासीयांना शुभेच्छा देखील दिल्या.













