▪️खेलो मास्टर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघातून सहभागी
▪️सरिता कदम नारिंग्रे गावची कन्या
मसुरे | झुंजार पेडणेकर 
चंदिगढ पंजाब येथे दिनांक 20 ते 22 मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कर्णधार लीना डोलकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारित महाराष्ट्राच्या 30 प्लस महिला गटात महाराष्ट्र संघाकडून खेळताना सिंधु कन्या सरिता कदम यांच्या चतुरस्त्र खेळामुळे सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र 30 प्लस महिला संघाने हिमाचल प्रदेश संघाला 27.9 गुणांनी पराभूत करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. या मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ देवगड तालुक्यातील नारिंग्रे गाव असलेल्या सौ सरिता कदम यांनी अंतिम सामन्यात एकूण11 महत्वपूर्ण पॉईंट महाराष्ट्र कबड्डी संघाला मिळवून दिले.
यावेळी भारतीय वरिष्ठ संघाचा माजी कॅप्टन तथा प्रो कबड्डी खेळाडू आणि प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार श्री अजय ठाकूर यांनी सरिता कदम यांचे भेटून विशेष अभिनंदन आणि कौतुक केले. मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र संघाला गौरविण्यात आले. महाराष्ट्र महिला संघात कर्णधार लीना डोलकर, उप कर्णधार मीना गायकवाड, सरिता कदम, कांचन गवळी, शिल्पा शिंदे, मालती गवळी, जया अग्रवाल, मनीषा गायकवाड या सर्वांनी छान खेळ केला. महाराष्ट्र संघाच्या या यशात संघ प्रशिक्षक दुर्वास धुळे, मार्गदर्शक अनिल जैन आणि संघ व्यवस्थापिका प्रीती टेमकर यांचा मोलाचा वाटा आहे. सर्व खेळाडूंना यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या महाराष्ट्र संघातील सर्व खेळाडूंना
खेलोमास्टर्स गेम्स नॅशनल फाउंडेशन तर्फे सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सिंधू कन्या सौ सरिता कदम यांना सुवर्णपदकाची कमाई कबड्डी क्रीडा क्षेत्रात लाभल्याने सिंधू वासीयांना अभिमानाचे आहे. ऐतिहासिक विजयाबद्दल आयोजक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे. सरिता कदम हिने यापूर्वीसुद्धा अनेक राष्ट्रीय कबड्डी क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सिंधुदुर्ग वासियांकडून लवकरच एक नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे मानवता विकास परिषदचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सांगितले.












