टेक्सासमधील खटल्यामुळे एनर्जी ड्रिंक्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

 

किशोरवयीन मुलीच्या मृत्यूनंतर कॅफिनवर लक्ष
लेबलिंग आणि मार्केटिंगवरही गंभीर आरोप

अमेरिकेतील टेक्सासमध्ये दाखल झालेल्या एका खटल्यामुळे एनर्जी ड्रिंक्सच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. 17 वर्षीय लॅरिसा रॉड्रिग्जच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाने कॅफिनच्या अतिसेवनाला जबाबदार धरले आहे. कोरोनरच्या अहवालात हृदयाशी संबंधित समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे उत्पादनाचे लेबलिंग, घटकांची माहिती आणि मार्केटिंग पद्धती यांवरही टीका होत आहे. विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या वापराबाबत चिंता वाढत आहे.


टेक्सास : वेस्लाको येथील 17 वर्षीय लॅरिसा रॉड्रिग्जच्या मृत्यूनंतर एनर्जी ड्रिंक्सच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कुटुंबीयांनी दाखल केलेल्या खटल्यात जास्त कॅफिनयुक्त पेयामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वकिलांच्या मते, एका कॅनमध्ये सुमारे 200 मिलीग्राम कॅफिन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कोरोनरच्या अहवालानुसार कॅफिनचे अतिसेवन आणि तणावामुळे हृदयविकाराचा त्रास वाढला असून कार्डिओमायोपॅथीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही स्थिती हृदयाच्या स्नायूंना कमकुवत करते आणि गंभीर प्रकरणात अचानक मृत्यू होऊ शकतो.

खटल्यात उत्पादनाच्या लेबलिंगवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. चेतावणी संदेश लहान आणि अस्पष्ट असल्याचा आरोप करण्यात आला असून घटकांची पूर्ण माहिती न दिल्यामुळे ग्राहक दिशाभूल होऊ शकते, असे नमूद करण्यात आले आहे. टॉरिनसारख्या उत्तेजक घटकांमुळे कॅफिनचा प्रभाव वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे एनर्जी ड्रिंक्सच्या मार्केटिंग पद्धतीवरही टीका होत आहे. निरोगी जीवनशैलीचा भाग म्हणून उत्पादनाचा प्रचार करून किशोरवयीन मुलांना लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे सुरक्षिततेबाबत चुकीचा संदेश दिला जात असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आरोग्य तज्ञांनी किशोरवयीन मुलांसाठी कॅफिनचे प्रमाण मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. हा खटला अद्याप प्राथमिक टप्प्यात असून कुटुंबीयांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे एनर्जी ड्रिंक्सच्या वापर आणि नियमनावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.