ट्रक चालकावर संशय
खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या लोटे एम.आय.डी.सी. मधील ‘नोव्होकेम टेक्नॉलॉजीस लिमिटेड’ या कंपनीत चोरीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. कंपनीच्या आवारातून सुमारे २,५४,९५० रुपये किमतीची लोखंडी वजन मापे अज्ञात चोरट्याने लंपास केली असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २५ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली. फिर्यादी अमोल आनंद अकुलकर (वय ४५, रा. चिपळूण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीच्या पॅकिंग स्टोअरच्या बाहेर लाकडी पॅलेटवर लोखंडी षटकोणी आकाराची २० किलो वजनाची वजन मापे ठेवली होती. १ एप्रिल रोजी सायंकाळी सर्व मापे सुरक्षित होती, मात्र २ एप्रिल रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास पाहणी केली असता, त्यातील १० वजन मापे गायब असल्याचे निदर्शनास आले.
चोरीचा संशय आल्याने कंपनी प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये २ एप्रिल रोजी सकाळी ८:२० वाजता कंपनीत आलेला एक आयशर ट्रक (क्रमांक MH-06-BW-3089) संशयास्पदरीत्या उभा असलेला दिसला. ट्रक चालक केबिनमधून खाली उतरून क्लिनर साईडच्या दरवाजाजवळ बराच वेळ रेंगाळताना दिसून आला. या ट्रक चालकानेच संधी साधून ही वजन मापे चोरल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चोरीला गेलेल्या मालामध्ये एकूण १५० लोखंडी वजन मापे (किंमत १,८७,५००/-) आणि ७१ वजन मापे (किंमत ६७,४५०/-) अशा एकूण २,५४,९५० रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. पोलीस आता संबंधित ट्रक आणि त्याच्या चालकाचा शोध घेत आहेत.











