तांब्याचे दोन मोठे हांडे चोरीला 

वायरी भूतनाथ वाईरकर रापण संघाच्या मच्छीमारी शेड मधून चोरी 

मालवण | प्रतिनिधी : वायरी भूतनाथ येथील वाईरकर रापण संघाच्या मच्छीमारी शेड मधून तांब्याचे दोन मोठे हांडे यांची चोरी झाली आहे. याबाबतची तक्रार वाईरकर रापण संघाच्या वतीने तुकाराम झाड यांनी मालवण पोलिसात दिली आहे. पोलिसांनी याबाबत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

वायरी भूतनाथ समुद्र किनारी पारंपारिक मासेमारी करणाऱ्या वाईरकर रापण संघाची शेड वजा झोपडी आहे. या शेड मध्ये सुमारे 70 ते 75 हजार किंमतीचे तांब्याच्या धातूचे दोन मोठे हांडे ठेवण्यात आले होते. ही दोन्ही हांडे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी लंपास केले आहेत. याच भागात पर्यटकांचा एक ग्रुप रात्री आपली भांडी घेऊन जेवण बनवत असल्याचे काही मच्छीमारांनी पाहिले होते. चोरीच्या घटनेची माहिती समजतात नागरिकांनी परिसरात या पर्यटकांच्या ग्रुपचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडून आले नाहीत.

 

पोलिसांनी चोरीच्या प्रकरणाचा शोध घेत चोरट्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.