कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जागतिक हिवताप दिन साजरा

मलेरिया निर्मूलनासाठी जनजागृती ; तपासणी व उपचार मोफत उपलब्ध

कणकवली : उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे शनिवारी २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सन २००७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ६० व्या अधिवेशनात मलेरिया हा केवळ आफ्रिका खंडापुरता मर्यादित नसून तो जागतिक स्तरावरील गंभीर आरोग्यविषयक प्रश्न असल्याचे अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे ‘आफ्रिका मलेरिया दिन’ या उपक्रमाचे रूपांतर ‘जागतिक मलेरिया दिन’ असे करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो.

भारत सरकारने २०२७ पर्यंत ‘मलेरिया मुक्त भारत’ आणि २०३० पर्यंत ‘मलेरिया निर्मूलन’ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मलेरिया आजारावरील तपासणी तसेच औषधोपचार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. धनंजय रासम, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, क्ष-किरण तज्ञ अशोक नारकर, किसन ठोंबरे, श्री. देवळेकर, वैभव फाले, अधिपरिचारिका नयना मुसळे, निधी राऊळ, पी. डी. कदम, वैशाली म्हसकर, कीर्ती पवार-सावंत, वंदना चव्हाण, सुशील परब, सचिन तांबे, सदा पुजारे आदी उपस्थित होते.