कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान; चालक जखमी; मोठा अनर्थ टळला
शंकर वैद्य / साखरपा
रत्नागिरी-नागपूर महामार्गांवरील संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी जवळील गोवरेवाडी बस थांब्याजवळ डिझेल टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश आनंदा पवार (वय ३९ रा. बेडग ता. मिरज जि. सांगली) हा आपल्या ताब्यातील डिझेल टँकर एम एच १०सी आर ५१८४मिरज ते रत्नागिरी ( एस टी डेपो रत्नागिरी )असा घेऊन जात असताना मुर्शी पोलीस चौकीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्यावरच पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल वाहून गेले. व झालेल्या अपघातात चालक सुरेश पवार जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी कुर्ले -पावसकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेणुका कांबळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या अपघातात मोठा अनर्थ टळला आहे.












