शिरगावच्या आर्थिक उन्नतीसाठी बँक कटिबद्ध पालकमंत्री नितेश राणे

शिरगावच्या आर्थिक उन्नतीसाठी बँक कटिबद्ध पालकमंत्री नितेश राणे

ग्रामस्थांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी

शिरगाव (प्रतिनिधी) :
“मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो, त्या शिरगाव व परिसराने नेहमीच राणेसाहेबांच्या विचारांना साथ दिली आहे. या गावाने आम्हाला पाठिंबा व आशीर्वाद दिल्यामुळे येथील ग्रामस्थांची आर्थिक उन्नती कशी साधता येईल, हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरगाव शाखेच्या नूतन कार्यस्थळाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, “शिरगाव शाखेची सध्याची उलाढाल सुमारे ४० कोटी रुपये असून ती ६० कोटींपर्यंत वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच ठामपणे पाठीशी उभी राहील.”
“सिंधुदुर्ग जिल्हा बँक विविध योजना राबवत असून माता-भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. बँकेवर विश्वास ठेवणे आणि तिच्याशी नाते दृढ ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
तसेच राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार पारदर्शक व विश्वासार्ह राहावा, यावर नेहमी भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी बँकेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल शिरगाव येथील सुधीर साटम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी दिवाकर देसाई यांनी केली. बँकेचे संचालक ॲड. प्रकाश बोडस व अध्यक्ष मनीष दळवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास जि.प. सदस्य देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य शीतल गावडे, तळवडे पंचायत समिती सदस्य सलोनी तळवडेकर, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित साटम, मिलिंद साटम, संतोष किंजवडेकर, नंदू देसाई, राजू शेट्ये, शिरगाव पंचक्रोशीतील विविध सोसायट्यांचे चेअरमन व संचालक, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक शरद सावंत, झेप सरव्यवस्थापक नितीन सावंत, शिरगाव शाखा व्यवस्थापक बापू शेळके, तालुका विकास अधिकारी संजय घाडी, संजय परब यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.