सरपंच यांच्यासह संघटना व देवस्थान सल्लागार उपसमितीची वीज वितरण कंपनीने कडे मागणी
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील प्रसिद्ध जैतिर उत्सव १६ मे रोजी साजरा होत आहे. गावात हा उत्सव अकरा दिवस कवळास उत्सवापर्यंत चालतो. त्यामुळे या कालावधीत वीज वितरण कंपनीने तुळस गावातील वीज पुरवठा कोणतेही कारण न देता सुरळीत चालू ठेवावाअशी मागणी गाव सरपंच सौ. रश्मी परब, छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष श्यामसुंदर राय आणि तुळस येथील जैतीर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीने केली आहे.
तुळस येथील हा उत्सव अकरा दिवस सुरू असतो. उत्सवानिमित्त दिवस-रात्र मंदिरामध्ये देवस्थानचे काम सुरू असते. उत्सवासाठी पुढील अवघे आठ दिवस शिल्लक असून त्यापूर्वी विद्युत मंडळाने दुरुस्तीची कामे असतील तर पूर्ण करून घ्यावीत. तसेच आताच लक्ष घालून जर वीज लाईन किंवा आपल्या इतर ठिकाणी काही कामे करायची असल्यास ती तत्काळ करावीत. उदाहरणार्थ रस्त्यालगत झाडीझुडपे असतील तर ती तोडणे, मान्सूनपूर्वी मेंटेनेस पूर्ण करावेत. कारण बरेच उद्योग धंदेवाले उत्सवानिमित्त येतात त्यामुळे काही बाबी हे विजेवरच अवलंबून असून या सर्व गोष्टींचा विचार करून वेंगुर्ला वीज वितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष द्यावा. त्याचप्रमाणे जैतिर उत्सवाची सांगताही २५ मे रोजी सोमवार असल्यामुळे त्या दिवशी वीज पुरवठा खंडित करू नये. अशी मागणी करण्यात आली आहे.












