तोरसोळे फाटा येथील अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

देवगड / प्रतिनिधी
तोरसोळे फाटा येथे रिक्षाला धडक देऊन अपघात केल्याप्रकरणी तसेच रिक्षाचालकाच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुमो गाडीचालक राजेंद्र पंढरीनाथ पारकर (६४, रा. आरे फाटा) या संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड कॉलेज रोडनजीकच्या समर्थ प्लाझा येथील सुरेश रामचंद्र नाईक (५०) हे २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील रिक्षाने (एमएच ०७, एएच ५७५१) तोरसोळे फाटा येथून प्रवास करीत होते. याचदरम्यान देवगड ते कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमो गाडीने (एमएच ०७, क्यू १४६०) त्यांच्या रिक्षेला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक सुरेश नाईक यांना गंभीर दुखापत झाली. तर त्यांच्या रिक्षेचेही मोठे नुकसान झाले. याबाबत सुरेश नाईक यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार संशयित सुमो गाडीचालक राजेंद्र पारकर याच्याविरुद्ध देवगड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता १२५ (ए), १२५ (बी), ३२४ (२), २८१ व मोटार वाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.