प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा मानस: आ. दीपक केसरकर
सावंतवाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात
एकूण ६८९ दाखले तयार : ४२७ लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप
सावंतवाडी | प्रतिनिधी : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर ‘ योजना सुरू करण्यात आली आहे. महसूल विभागाशी संबंधित गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी हे अभियान एक प्रभावी माध्यम ठरत आहे. वेंगुर्ले गवळीवाडा, गेळे काबुलायदार ७/१२ उतारा वाटप आणि कातकरी समाजबांधवांना हक्काच्या जमिनीचे वाटप यांसारखे महत्त्वाचे निर्णय मार्गी लावले जात आहेत. या अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले असून छत्रपतींच्या आदर्शांचे अनुकरण करून जनतेला अभिप्रेत असा पारदर्शक कारभार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी केले.
प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा पहिला टप्पा सावंतवाडीत यशस्वीरित्या पार पडला. येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित शिबिरात माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या मोहिमेत पहिल्या टप्प्यात एकूण ६८९ दाखले तयार करण्यात आले असून, त्यापैकी ४२७ दाखल्यांचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत सावंतवाडी मंडळात विशेष मोहीम राबवून शेतकरी दाखल्यांपासून ते संजय गांधी निराधार योजनेपर्यंतच्या विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. एकूण तयार ६८९ दाखल्यांपैकी २६२ दाखले वितरणासाठी शिल्लक असून, उर्वरित ४२७ दाखले संबंधित लाभार्थ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, प्रांताधिकारी श्रद्धा पवार, तहसीलदार श्रीधर पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, उत्कर्षा गांवकर, प्रणाली टिळवे आदींसह तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान तहसीलदार श्रीधर पाटील यांनी महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रशासकीय कामात सुसूत्रता आणणाऱ्या आणि थेट जनतेला लाभ मिळवून देणाऱ्या या शिबिराचे सावंतवाडी तालुक्यात कौतुक होत आहे.













