चिपळूण /संतोष सावर्डेकर:
उन्हाळी सुट्टीमध्ये कोकणवासियांची पावले गावाकडे वळत आहेत. मुंबई -गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ आहे. यामुळे कोकणवासीयांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. महामार्गावरील काही सीएनजी पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याने अन्य सीएनजी पंपावर वाहनांची मोठी रांग लागलेली दिसून येत असून बाचाबाचीचे प्रकार देखील घडत आहेत. कोकण रेल्वे देखील विक्रमी गर्दीने धावत असून कोकणवासीयांना गावाची ओढ असल्याने भर गर्दीत देखील त्रास सहन करीत आपा-आपली गावे गाठत आहेत. एकंदरीत हा उन्हाळी सुट्टीचा परिणाम असल्याचे दिसून येत आहे.
कोकणातील सुशिक्षित तरुण नोकरीधंद्यानिमित्त मुंबईसह पुणे सारख्या शहरांमध्ये स्थिरावला आहे. मात्र, गणेशोत्सव असो शिमगोत्सव असो तसेच मे महिना उन्हाळी सुट्टी असो, या कालावधीत चाकरमान्यांची पावले आपापल्या गावाकडे वळतात. गावाची ओढ असल्याने चाकरमनी एसटी बसेस, खाजगी वाहने, खाजगी आराम बसेस, रेल्वे या वाहनांनी गावाकडे येतात. मात्र, चाकरमान्यांची गावाकडे येणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता ही सर्व साधने अपुरी पडताना दिसत आहेत. गणेशोत्सव शिमगोत्सव व उन्हाळी सुट्टी या कालावधीत परिवहन महामंडळ व कोकण रेल्वे कडून ज्यादा गाड्यांची व्यवस्था केली जाते. प्रवास सुखकर व्हावा, यासाठी चाकरमनी काही महिन्यांपूर्वीच आरक्षणे करतात. मात्र, काहीना आरक्षणे मिळत नाही. यामुळे मिळेल त्या वाहनाने चाकरमनी आपापल्या गावाकडे येण्यासाठी निघतो. मात्र, या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा-गर्दीचा मोठा फटका बसत आहे.
उन्हाळी सुट्टीमुळे कोकणवासियांची पावले गावाकडे वळत असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्टी हंगामासाठी अवघ्या ५ पुन्हा स्पेशल गाड्या चालवत प्रवाशांना काही अंशी दिलासा दिला असला तरी अपुऱ्या उन्हाळी स्पेशलमुळे कोकणवासीयांना गाव गाठताना यातायात करावी लागत आहे. यंदा प्रथमच कोकणवासीयांच्या जयंतीला दिवा -चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल गाडी सुरू केली आहे. मात्र, या गाडीला देखील मोठी गर्दी होताना दिसत आहे. शेकडो प्रवासी तर पनवेलवरून गावाकडे येण्यासाठी दिवा असा उलटा प्रवास करीत आहेत. यामुळे दिवा रेल्वे स्टेशनवर या गाडीची प्रतीक्षा करीत असलेल्या चाकरमान्यांना बसायला देखील संधी मिळत नाही. इतकी मोठी गर्दी दिवा चिपळूण- मेमू स्पेशल गाडीला पहावयास मिळत आहे. यामुळे तासंतास उभे राहून बालगोपाळांसह चाकरमन्यांना प्रवास करावा लागत आहे. ही गर्दी पाहता आणखी एका जादा गाडीची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे विलंबाने धावत असल्याने चाकरमान्यांना याचा देखील मोठा फटका बसत आहे.
उन्हाळी सुट्टी लक्षात घेता परिवहन महामंडळाने देखील जादा गाड्यांची सोय केली आहे. मात्र, या गाड्यांना देखील गर्दी असल्याने विशेषत: प्रचंड ऊन असल्याने प्रवाशांना या कडक उन्हाचा देखील त्रास सहन करावा लागत आहे. खाजगी वाहनांची देखील मोठी वर्दळ मुंबई गोवा महामार्गावर दिसत आहे खाजगी आराम बसेस गाड्यांना देखील गर्दी असून या खाजगी वाहनधारकांकडून भरमसाठ भाडे आकारले जात आहे. या भाडे आकारणीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने याचा देखील फटका चाकरमान्यांना नाईलाजास्तव सहन करावा लागत आहे. याकडे शासन प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
मुंबईहून गावाकडे येणाऱ्या चाकरमन्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे रेल्वे, एसटी बसेसना गर्दी, खाजगी आराम बसेस धारकांकडून भरमसाठ भाडे आकारणी, वाहतूक कोंडी, तसेच खाजगी वाहनांमधून प्रवास करताना सीएनजी पंपावर होत असलेली गर्दी व त्यातून बाबाचीचे प्रकार एकंदरीत चाकरमन्यांचा प्रवास हा कटकटीचा- त्रासदायक जीवघेणा ठरत आहे. याचबरोबर मुंबई- गोवा महामार्गावर वाहनांची वाढती संख्या पाहता काही ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. यामुळे चाकरमन्यांचा प्रवास सुखकर कधी होणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.












