अटल प्रतिष्ठानचे समाजोपयोगी उपक्रम कौतुकास्पद: जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत

भेडशी येथे मोफत आरोग्य शिबिराचे उत्साहात उद्घाटन; १५० हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ
​
दोडामार्ग :सुहास देसाई

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिप्रेत असलेले सामाजिक कार्य गेली वीस वर्षांहून अधिक काळ ॲड. नकुल पार्सॅकर आणि त्यांचे सहकारी सातत्याने करत आहेत. हे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून,भेडशी येथील तरुण उद्योजक आणि युवा सामाजिक कार्यकर्ते बाबा टोपले यांची साथ लाभल्याने भविष्यात हे कार्य आणखीन प्रभावीपणे पुढे सुरू राहील, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी व्यक्त केला.

​भेडशी येथे अटल प्रतिष्ठान व बाबा टोपले मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सॅकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “प्रत्येक वेळी केवळ सरकारवर अवलंबून न राहता, सरकारच्या मदतीने आपण स्वतः पुढाकार घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सरकारच्या मर्यादा लक्षात घेऊन सामाजिक संस्थांनी जर असे उपक्रम राबवले, तर भविष्यात याचे निश्चितच सकारात्मक परिणाम पहायला मिळतील. यासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे.” जिल्ह्यात काम करताना प्रशासनाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

​उपस्थित डॉक्टरांच्या वतीने बोलताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश नवांगुळ म्हणाले की, जिल्ह्यात खाजगी असो वा सरकारी सेवा देताना नागरिकांनी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील स्नेहबंध घट्ट करणे गरजेचे आहे. जेव्हा डॉक्टरांवर हल्ले होतात, तेव्हा डॉक्टर हा सुद्धा एक माणूस असतो याचा विचार करून समाजाने संयम बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले

​यावेळी जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांचा बाबा टोपले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बांबूचे स्मृतीचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आर्य टोपले याने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला

​या शिबिरात भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. अभिजीत चितारी, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. नेहा पावसकर, डॉ. सागर कोल्हे, डॉ. निखिल अवधूत, डॉ. विनय सूर्यवंशी अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. १५० पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आला, तसेच माफक दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. यासोबतच ‘आयुष्यमान भारत’ योजनेअंतर्गत अनेकांची नोंदणीही करण्यात आली.
​
​या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, उपसरपंच सौ. मिलन डिंगणेकर, भाऊ टोपले, सौ. गौरी टोपले, सूर्यकांत धर्णे, अनिल मोरजकर, अटल प्रतिष्ठानचे कार्यवाह रघुनाथ तानावडे, विश्वस्त बाळकृष्ण लिंगवत, राजाराम पार्सॅकर, समुपदेशक श्रीमती तृप्ती धुरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

​शिबीर यशस्वी करण्यासाठी भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच रामकृष्ण डांगी, नंदकिशोर टोपले आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्पिता वाटवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाबा टोपले यांनी मानले.