कोकण रेल्वेच्या काही गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डब्यांची वाढ

रत्नागिरी : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पश्चिम रेल्वेकडून काही गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

 

यानुसार गाडी क्रमांक १०११६ / १०११५ मडगाव जंक्शन – बांद्रा टर्मिनस – मडगाव जंक्शन एक्सप्रेस (द्विसाप्ताहिक) तसेच गाडी क्रमांक १०२१५ / १०२१६ मडगाव जंक्शन – एर्नाकुलम जंक्शन – मडगाव जंक्शन एक्सप्रेस (साप्ताहिक) या गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहेत.

 

पूर्वी या गाड्यांमध्ये २ टियर एसीचा १, ३ टियर एसीचे ३, ३ टियर इकॉनॉमीचे २, स्लीपरचे ८, जनरलचे ४, जनरेटर कार १ आणि एसएलआर १ असे एकूण २० एलएचबी डबे होते. सुधारित रचनेनुसार ३ टियर एसी डब्यांची संख्या ४ करण्यात आली असून एकूण डबे २१ एलएचबी इतके झाले आहेत.

 

गाडी क्रमांक १०११६ मडगाव जंक्शन येथून २६ मे २०२६ पासून, तर गाडी क्रमांक १०११५ बांद्रा टर्मिनस येथून २७ मे २०२६ पासून नवीन रचनेनुसार धावणार आहे.

 

तसेच गाडी क्रमांक १०२१५ मडगाव जंक्शन येथून २४ मे २०२६ पासून आणि गाडी क्रमांक १०२१६ एर्नाकुलम जंक्शन येथून २५ मे २०२६ पासून अतिरिक्त डब्यांसह सुरू होणार आहे.

 

प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नर्कर यांनी केले आहे.