राजापूर (वार्ताहर): खिशात पैसे असोत वा नसोत, प्रवासी इच्छित स्थळी पोहोचला पाहिजे, हाच जीवनमंत्र जपणारे तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथील सुप्रसिद्ध रिक्षा व्यावसायिक ताजु वाडेकर (५५) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओणी येथे प्रवासी सोडण्यासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली, मात्र शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि सेवेचा धर्म पाळला.
गोठणे दोनिवडे येथील रहिवासी असलेले वाडेकर पूर्वी फ्रिज मेकॅनिकल म्हणून परदेशात नोकरीला होते. मात्र, गावाकडच्या ओढीने काही वर्षांपूर्वी ते परतले. सुमो आणि रिक्षाच्या माध्यमातून त्यांनी केवळ व्यवसाय केला नाही, तर माणसे जोडली.
नेहमी उलटी टोपी घालण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे ते संपूर्ण पंचक्रोशीत ‘उलटी टोपी’ याच नावाने ओळखले जात. त्यांचा मनमिळावू, मिश्कील स्वभाव आणि मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे ते पंचक्रोशीत ओळखले जात.
गोठणे दोनिवडे -राजापूर या मार्गावर ते आपला व्यवसाय करीत. या मार्गावरील शालेय मुलांना ते मोफत सेवा देत. रात्री-अपरात्री कोणाचीही हाक असो, वाडेकर आपली गाडी घेऊन हजर असायचे.
शेवटपर्यंत ‘प्रवासी सेवा’ हीच ईश्वर सेवा मानून जगले. मंगळवारी ओणी येथे प्रवासी सोडायला जात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचे रिक्षा वरील नियंत्रण सुटले. रिक्षा पलटी झाली, पण सुदैवाने प्रवाशांना मोठी इजा झाली नाही. ओणी येथील रिक्षा व्यवसायिकांनी त्यांना ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
कोणत्याही प्रवाशाची अडचण ती आपली अडचण समजून ते व्यवसायापलीकडे मदत करत असत. आपल्या जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रवासी सेवेला प्राधान्य दिले. ही गोष्ट निश्चित आदर्शवत होती. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.









