▪️मसुरे येथे १९९९-२००० बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
▪️शाळेला दिली १० हजारांची देणगी
मसुरे | झुंजार पेडणेकर
शालेय जीवनातील सोनेरी आठवणींना उजाळा देत आर. पी. बागवे हायस्कूल मसुरे येथील सन १९९९-२००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात संपन्न झाले. तब्बल २५ वर्षांनंतर एकमेकांना भेटल्याचा आनंद सर्वच माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आपल्या मातृभूमीचे आणि शाळेचे ऋण फेडण्यासाठी या बॅचच्या वतीने प्रशालेला १०,००० रुपयांची स्वेच्छा देणगी सुपूर्द करण्यात आली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे शालेय जीवनाचा पुन्हा एकदा आलेला अनुभव. प्रशालेचे शिक्षक श्री. रमेश पाताडे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना वर्गात बसवून जुन्या काळाप्रमाणे हजेरी घेतली. ‘प्रेझेंट सर’ म्हणताना सर्वच जण पुन्हा एकदा बालपणात हरवून गेले होते. या अनोख्या उपक्रमामुळे अनेक जण भावूक झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर. पी. बागवे हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने मनापासून स्वागत केले. अनेक वर्षांनंतर एकत्र येऊन शाळेप्रती दाखवलेल्या कृतज्ञतेबद्दल त्यांनी या बॅचचे विशेष कौतुक केले व आभार मानले.
या स्नेहसंमेलनासाठी जुने मित्र-मैत्रिणी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. सचिन परब, शितल गिरकर, गणेश मुणगेकर, शारदा ठाकूर, सोनाली गावडे, दीपा ठाकूर,
शंकर हडकर, सच्चिदानंद गोसावी, शिल्पा कामतेकर, सुजाता कासले, प्रकाश चव्हाण, अवधूत चव्हाण,
श्रद्धा सावंत, जीवन मुणगेकर, सीमा मुणगेकर, सुलभा मुणगेकर, संजय बांदकर, स्वप्नाली पोयरेकर, प्रकाश भोगले आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. लिपिक दयानंद पेडणेकर, अनिल मेस्त्रीयांचा सन्मान करण्यात आला. यावेली सर्वांनी आपल्या शालेय जीवनातील विविध आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबतच्या गमतीजमती शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा सोहळा सर्वांच्याच मनात कायमचे घर करून राहणारा ठरला.













